WI vs SA 2nd T20 : द. आफ्रिकेचा सलग दुसरा पराभव, दुसऱ्या टी-20 मध्ये वेस्टइंडिज 30 धावांनी विजयी….

WI vs SA 2nd T20 : टी-20 विश्वचषकाचा (T20WC 2024) अंतिम सामना गमावल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने आता वेस्ट इंडिजविरुद्धची टी-20 मालिकाही गमावली आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेचा 30 धावांनी पराभव केला. यासह तीन सामन्यांच्या या मालिकेत वेस्टइंडिजने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. याआधी, दोन्ही संघांनी येथे 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळली होती, ज्यामध्ये यजमान संघाला 0-1 ने पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र टी-20 मालिकेतील विजयासह त्यांनी कसोटीतील पराभवाचा हिशोब चुकता केला आहे.
रविवारी ब्रायन लारा क्रिकेट अकादमी स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात एकेकाळी दक्षिण आफ्रिका विजयाकडे वाटचाल करत होती, पण वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी खेळाचा मार्ग बदलून दक्षिण आफ्रिकेला पराभवाच्या उंबरठ्यावर आणले.
🟢🟡 | Match Result
🏝️West Indies win by 30 runs
They take an unassailable 2-0 lead in the 3-match T20 series.#WozaNawe #BePartOfIt#SAvWI pic.twitter.com/uJg2HllvRL
— Proteas Men (@ProteasMenCSA) August 25, 2024
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, परंतु ही चाल उलटी झाली. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 20 षटकात 6 बाद 179 धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली. यादरम्यान सलामीवीर शाई होपने 22 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकारासह सर्वाधिक 41 धावा केल्या. मधल्या षटकांमध्ये निकोलस पूरनने आपल्या शैलीच्या विरुद्ध खेळताना 19 चेंडूंत 19 धावांची शांत खेळी खेळली, ज्यात केवळ एका षटकाराचा समावेश होता. पण स्लॉग ओव्हर्समध्ये कर्णधार रोव्हमन पॉवेल आणि शेरफेन रदरफोर्ड यांनी स्फोटक खेळी खेळून वेस्ट इंडिजला 180 च्या जवळ नेले. पॉवेलने 22 चेंडूत 1 चौकार आणि 3 षटकारांसह 35 धावा केल्या. रदरफोर्डनेही 18 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांसह 29 धावा केल्या.
प्रत्युत्तरात विजयासाठी 180 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने चांगली सुरुवात केली होती. पॉवरप्लेमध्ये 2 गडी गमवताना त्यांनी 71 धावां केल्या होत्या. यष्टिरक्षक फलंदाज रायन रिकेल्टन 13 चेंडूत 20 आणि रीझा हेंड्रिक्स 18 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकासह 44 धावा करत बाद झाला. यानंतर, कर्णधार एडन मार्करम 9 चेंडूत 19 आणि ट्रिस्टन स्टब्स 24 चेंडूत 28 धावा काढून बाद झाल्यानंतर त्याचा डाव पूर्णपणे गडगडला.
हेंड्रिक्सने खेळलेल्या 18 चेंडूत 44 धावांची खेळी संघाला विजयाच्या दिशेने घेऊन गेली. 129 धावांवर 3 विकेट्स गमावल्यानंतर दक्षिण आफ्रिका विजयापासून अवघ्या 51 धावा दूर होती, मात्र यानंतर संघाची फलंदाजीची पूर्णपणे ढासळली. त्याचे तळाचे सर्व फलंदाज फ्लॉप ठरले आणि शेवटच्या 6 फलंदाजांपैकी एकही फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकला नाही.
वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी 35 चेंडूत अवघ्या 20 धावा देऊन दक्षिण आफ्रिकेच्या शेवटच्या 7 विकेट घेतल्या, त्यामुळे संपूर्ण संघ 149 धावांत ऑलआऊट झाला. रोमॅरियो शेफर्डने 3 बळी घेत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली, तर शामर जोसेफने 3 बळी घेत वेस्ट इंडिज संघाला विजयापर्यंत नेले.
सलग तिसरा टी-20 मालिका विजय…..
वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील शेवटचा टी-20 सामना 28 ऑगस्ट रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12.30 वाजता होणार आहे. मात्र या मालिकेत वेस्ट इंडिज 2-0 ने आघाडीवर असून मालिकाही खिशात टाकली आहे. यापूर्वी, वेस्ट इंडिजने मे 2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-20 मालिका 3-0 ने जिंकली होती तर मार्च 2023 मध्ये झालेल्या टी-20 मालिकेत वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2-1 असा विजय नोंदवण्यात यश मिळवले होते. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धची सलग तिसरी टी-20 मालिका जिंकण्यात वेस्ट इंडिजला यश आले आहे.





