SA vs WI : दक्षिण अफ्रिकेनं वेस्ट इंडिजला लोळवलं; दुसरी कसोटी जिंकत मालिकेवरही केला कब्जा…

WI vs SA 2nd Test Match Result : दक्षिण आफ्रिकेचा संघ वेस्ट इंडिजविरुद्धची 2 सामन्यांची कसोटी मालिका 1-0 ने जिंकण्यात यशस्वी ठरला. गयानाच्या मैदानावर उभय संघांमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसरा सामना तिसऱ्या दिवशीच संपला ज्यामध्ये आफ्रिकेने 40 धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत (ड्राॅ) राहिला होता. सामन्याच्या चौथ्या डावात वेस्ट इंडिज संघासमोर 263 धावांचे लक्ष्य होते. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजच्या संघाला 222 धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली. दक्षिण आफ्रिकेच्या विजयात विआन मुल्डर आणि केशव महाराज यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. केशव महाराज मालिकावीर तर विआन मुल्डर सामनावीर ठरला.
गयाना येथील प्रॉव्हिडन्स स्टेडियमवर खेळवण्यात आलेली मालिकेतील दुसरी कसोटी खूपच रोमांचक झाली. या सामन्यात आधी दक्षिण आफ्रिका आणि नंतर वेस्ट इंडिज कमजोर दिसले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात 160 धावांत गारद झाला. त्यानंतर पहिल्या डावात उतरलेल्या वेस्ट इंडिजचा डावही 144 धावांवर आटोपला. दोन्ही संघांच्या पहिल्या डावात गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले.
Not the result WI wanted, a fight to the end with experience gained and lessons learned. Let’s continue to support and RALLY with the #MenInMaroon🏏🌴 #WIvSA pic.twitter.com/gqqCdYAjDu
— Windies Cricket (@windiescricket) August 17, 2024
दुसऱ्या डावात आफ्रिकन गोलंदाजांची दमदार कामगिरी…
गयाना कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या डावात 246 धावांवरच मर्यादित राहिला. यानंतर वेस्ट इंडिज संघाला 264 धावांचे लक्ष्य मिळाले. यानंतर संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि त्यांनी 12 धावांवर पहिली विकेट गमावली. यानंतर 104 धावा होईपर्यंत वेस्ट इंडिजचे 6 खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतले होते. इथून जोशुआ डी सिल्वा आणि गुडाकेश मोती यांच्यात 50 हून अधिक धावांची भागीदारी पाहायला मिळाली, ज्यामुळे वेस्ट इंडिजचा संघ हा सामना जिंकू शकेल असे वाटत होते, पण 181 धावांच्या धावसंख्येवर वेस्ट इंडिज संघाला सातवा धक्का बसला. गुडाकेश मोती 59 चेंडूत 45 धावांची खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतला.इथून आफ्रिकन गोलंदाजांना वेस्ट इंडिजचा डाव गुंडाळायला जास्त वेळ लागला नाही. आफ्रिकेकडून चौथ्या डावात कागिसो रबाडा आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी 3-3 तर विआन मुल्डर आणि डेन पेडिएट यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.
केशव आणि डीजाॅर्जची चमकदार कामगिरी…
या मालिकेत केशव महाराजाची अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली, ज्याने या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत एकूण 13 बळी घेतले. या काळात केशवने एका डावात दोनदा 4-4 विकेट घेण्याचा पराक्रमही केला आहे. या मालिकेत सर्वाधिक धावा दक्षिण आफ्रिका संघाचा सलामीचा फलंदाज टोनी डीजॉर्जच्या बॅटमधून दिसल्या ज्यात त्याने 4 डावात 40 च्या सरासरीने 163 धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक :
दक्षिण आफ्रिका (पहिला डाव) : 160/10 (डेन पिएड 38* (60),डेव्हिड बेडिंगहॅम 28(54), शामर जोसेफ 5/33 (14),जेडेन सील्स 3/45 (14))
वेस्ट इंडिज (पहिला डाव) : 144/10 (जेसन होल्डर 54* (88), केसी कार्टी 26 (37), विआन मुल्डर 4/32 (9), नांद्रे बर्गर 3/49 (12))
दक्षिण आफ्रिका (दुसरा डाव) : 246/10 (काइल व्हेरेने 59 (78), एडन मार्करम 51 (108), जेडेन सील्स 6/61 (18.4), जोमेल वॅरिकन 2/21 (9))
वेस्ट इंडिज (दुसरा डाव) : 222/10 (गुडाकेश मोती 45 (59), कावेम हॉज 29 (38), केशव महाराज 3/37 (11.2), कागिसो रबाडा 3/50 (16))





