WI vs SA 3rd T20 : कसोटी मालिकेतील पराभवाचा हिशोब चुकता, टी-20 मध्ये वेस्ट इंडिजचा आफ्रिकेला 3-0 ने व्हाईट वॉश…

WI vs SA 3rd T20I Highlights : वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेचा तिस-या टी-20 सामन्यात पराभव केला. दोघांमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली गेली, ज्यामध्ये वेस्ट इंडिजने आफ्रिकेला 3-0 असा ‘व्हाईट वॉश’ दिला. पहिल्या आणि दुसऱ्या टी-20 प्रमाणेच यजमान वेस्ट इंडिजने तिसऱ्या सामन्यातही आफ्रिकन संघाचा दारूण पराभव केला. रोमॅरियो शेफर्डला सामनावीर तर शाई होपला मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याआधी, दोन्ही संघांनी येथे 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळली होती, ज्यामध्ये यजमान संघाला 0-1 ने पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र टी-20 मालिकेतील विजयासह त्यांनी कसोटीतील पराभवाचा हिशोब चुकता केला आहे.
त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला, त्यामुळे चाहत्यांना 20-20 षटकांच्या सामन्याचा आनंद घेता आला नाही. पावसामुळे, सामना प्रत्येकी 13 षटकांचा करण्यात आला, ज्यामध्ये वेस्ट इंडिजने 8 विकेट्सने विजय मिळवला. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो त्यांच्यासाठी योग्य ठरला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या आफ्रिकन संघाने 13 षटकांत 4 गडी गमावून 108 धावा केल्या होत्या. ट्रिस्टन स्टब्सने संघासाठी सर्वात मोठी आणि वेगवान खेळी खेळली आणि 15 चेंडूत 40 धावा केल्या, ज्यात त्याने 5 चौकार आणि 3 षटकार मारले. या काळात वेस्ट इंडिजकडून रोमॅरियो शेफर्डने सर्वाधिक 2 बळी घेतले.
🟢🟡 | Match Result
🏝️West Indies win by 8 wickets (DLS).#WozaNawe #BePartOfIt #SAvWI pic.twitter.com/vwq0REgUus
— Proteas Men (@ProteasMenCSA) August 27, 2024
22 चेंडू राखून मिळवला विजय…
विजयासाठी 109 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने 9.2 षटकात ( 22 चेंडू आणि 8 विकेट्स राखून) 116 धावा करत सहज विजय मिळवला. संघासाठी सलामी देणाऱ्या शाई होपने शानदार खेळी खेळली आणि 24 चेंडूत 1 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 42 धावा केल्या. याशिवाय निकोलस पूरनने 13 चेंडूत 269.23 च्या स्ट्राइक रेटने 35 धावा केल्या, ज्यात 2 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. उर्वरित काम शिमरॉन हेटमायर यांनी केले. हेटमायरने 17 चेंडूत 182.35 च्या स्ट्राइक रेटने नाबाद 31 धावा केल्या, ज्यात त्याने 4 चौकार आणि 1 षटकार मारला.
या काळात आफ्रिकन गोलंदाज पूर्णपणे फ्लॉप असल्याचे दिसून आले. संघाकडून ओटनीएल बार्टमन आणि ब्योर्न फोर्टुइन यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला. बार्टमॅनने 2 षटकात 16 च्या इकॉनॉमीसह 32 धावा दिल्या, तर फोर्टुइनने 1 षटकात 8 धावा दिल्या. क्वेना माफाका हा सर्वात महागडा गोलंदाज ठरला, ज्याने 2 षटकांत 34 धावा दिल्या.
WI vs SA 2nd T20 : द. आफ्रिकेचा सलग दुसरा पराभव, दुसऱ्या टी-20 मध्ये वेस्टइंडिज 30 धावांनी विजयी….
वेस्ट इंडिजचा सलग तिसरा टी-20 मालिका विजय…..
वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेविरूध्द तिसरा टी-20 सामना जिंकताना मालिकाही 3-0 ने खिशात टाकली आहे. हा वेस्टइंडिजचा आफ्रिकेविरूध्द सलग तिसरा टी-20 मालिका विजय ठरला, यापूर्वी वेस्ट इंडिजने मे 2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-20 मालिका 3-0 ने जिंकली होती तर मार्च 2023 मध्ये झालेल्या टी-20 मालिकेत वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2-1 असा विजय नोंदवण्यात यश मिळवले होते. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धची सलग तिसरी टी-20 मालिका जिंकण्यात वेस्ट इंडिजला यश आले आहे.





