गुजरातमध्ये कॉंग्रेसला जोर का झटका ! दोन बडे नेते भाजपमध्ये दाखल

गांधीनगर – ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसला गुजरातमध्ये जोर का झटका बसला. त्या पक्षाचा हात सोडून अर्जुन मोढवाडिया आणि अंबरिश डेर या बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष मोढवाडिया आणि माजी कार्याध्यक्ष डेर यांनी सोमवारी त्या पक्षातून बाहेर पडत असल्याची घोषणा केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते भाजपमध्ये दाखल झाले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांच्या उपस्थितीत दोन्ही नेत्यांनी त्या पक्षाचे औपचारिक सदस्यत्व स्वीकारले. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा पुढील दोन दिवसांत गुजरातमध्ये दाखल होईल.
त्याआधी दोन बड्या नेत्यांच्या भाजप प्रवेशाने कॉंग्रेसला मोठा राजकीय हादरा बसला. गुजरातमधील प्रभावी विरोधी पक्षनेत्यांपैकी मानले जाणारे ६७ वर्षीय मोढवाडिया तर ४० वर्षांपासून कॉंग्रेसमध्ये सक्रिय होते.
मोढवाडिया यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला. त्यामुळे मागील ४ महिन्यांत कॉंग्रेसमधून बाहेर पडलेले ते तिसरे आमदार ठरले आहेत. मोढवाडिया यांच्या राजीनाम्यामुळे गुजरातमधील कॉंग्रेस आमदारांची संख्या घटून १४ इतकी झाली आहे.
अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याच्या कॉंग्रेसच्या निर्णयाविषयी नापसंती व्यक्त करत मोढवाडिया आणि डेर यांनी तो पक्ष सोडला.





