Ayodhya Ram Mandir : अयोध्या प्रकरणी पंतप्रधान मोदी अजुनही गप्प का? कॉंग्रेस नेत्यांचा थेट सवाल
हा अपहार म्हणजे भारताच्या इतिहासातील एखाद्या धार्मिक स्थळाची झालेली आतापर्यंतची सर्वात मोठी लूट आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

Ayodhya Ram Mandir – अयोध्या येथील राम मंदिराला मिळालेल्या देणग्यांमध्ये झालेल्या कथित अपहारावर काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी शनिवारी तीव्र आक्षेप घेतला आहे. हा अपहार म्हणजे भारताच्या इतिहासातील एखाद्या धार्मिक स्थळाची झालेली आतापर्यंतची सर्वात मोठी लूट आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. तसेच या गंभीर मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी अजूनही गप्प का आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. (Ayodhya Ram Mandir)
केरळमधील प्रसिद्ध गुरुवायूर मंदिराबाहेर पत्रकारांशी बोलताना वेणुगोपाल म्हणाले की, आगामी संसद अधिवेशनात काँग्रेस पक्ष या मुद्द्यावरून पंतप्रधानांकडून उत्तर मागेल. आम्ही हा मुद्दा देशभरात सातत्याने लावून धरत आहोत आणि पुढेही धरू. या लुटीमुळे देशातील कोट्यवधी भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. (Ayodhya Ram Mandir)
मात्र, पंतप्रधान आणि गृहमंत्री यावर पूर्णपणे गप्प आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांचे जे विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे, त्याचा उद्देश केवळ मूळ गुन्हेगारांना वाचवणे हाच आहे. या महाघोटाळ्यातील खरे गुन्हेगार कोण आहेत, हे केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली होणाऱ्या चौकशीतूनच समोर येऊ शकते, असा दावा त्यांनी केला. (Ayodhya Ram Mandir)
गेल्या २० ते २५ वर्षांत मंदिराच्या नावावर भाविकांकडून कोट्यवधी रुपयांच्या देणग्या आणि सोने गोळा केले होते. आता याच पैशांची आणि सोन्याची मोठी लूट झाली आहे. हे सर्व मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या संगनमताने झाले असून, या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती स्वतः पंतप्रधानाच्या देखरेखीखाली झाली होती. (Ayodhya Ram Mandir)
भाजप आणि आरएसएस हे खरे भाविक नाहीत, असा टोला लगावत वेणुगोपाल म्हणाले की, त्यांना केवळ हिंदूंच्या नावावर लूट करण्यात आणि मतांसाठी लोकांमध्ये फूट पाडण्यात रस आहे. हा केवळ पैशांचा अपहार नसून भाविकांच्या श्रद्धेवर केलेला थेट हल्ला आहे.






