Maratha Reservation : जरांगे मुख्यमंत्र्यांबाबत सतत का बोलतात? भाजपच्या आमदाराने स्पष्टच सांगितलं म्हणाले…

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा लढा आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. काल मराठा समाजाचे प्रणेते मनोज जरांगे मुंबईत दाखल झाले. त्यांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी आठ तासांची मुदत देण्यात आली होती. मात्र, या वेळेत आता वाढ करण्यात आली असून, आज म्हणजेच दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच राहणार आहे.
दरम्यान, काल आंदोलनस्थळी काही आमदार आणि खासदारांनी भेट देत मनोज जरांगेंसोबत चर्चा केली. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी रात्री आझाद मैदानावर येऊन मनोज जरांगेंची भेट घेतली. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांनी जरांगेंसोबत चर्चा केली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांना प्रतक्रिया दिली.
तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार
मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षांची भेट घेणार. मराठा आरक्षण प्रकरणी या आधीही मधस्ती केली, आताही मधस्ती करून लवकरात लवकर मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचं धसांनी म्हटलं आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली.
मनोज जरांगे काल मुंबईतील आझाद मैदानावर सकाळी १० वाजता उपोषणाला बसले असून आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. जरांगेंनी काल बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीकेची तोफ डागली. आता मागे हटणार नाही, डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय थांबणार नाही, असा निर्धार मनोज जरांगेंनी केला आहे.
ते विरोधी पक्षनेत्यावर कशाला बोलतील?
जरांगे सातत्याने मराठा आरक्षणाला धेऊन मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत आहेत. यावर बोलताना सुरेश धस यांनी मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असून तेच निर्णय घेणार आहेत. या आधीचे निर्णयही त्यांनीच घेतले होते. त्यांच्याकडून अपेक्षा आहे, त्यामुळेच मनोज जरांगे त्यांच्यावरच बोलणार, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. ते विरोधी पक्षनेत्यावर कशाला बोलतील? असा सवालही धसांनी यावेळी बोलताना उपस्थित केला.
एक निर्णय मान्य करण्यात आला?
जरागेंच्या आंदोलनाला राजकीय नेत्यांनी भेट दिली आहे. आता हे जास्त न ताणता, लवकरात लवकर निर्णय व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करू, अशी ग्वाही धसांनी दिली आहे. मनोज जरांगे यांच्या मागणीतील एक निर्णय मान्य करण्यात आला आहे. इतरही मागण्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं देखील धस म्हणाले आहेत.
हेही वाचा : Pimpri Crime | हॉटेल व्यावसायिकाच्या जीवावर उठले ; लोखंडी रॉडने मारहाण





