अण्णा हजारे यांचा विश्वासघात का केला? भाजपचा केजरीवाल यांना प्रतिसवाल

नवी दिल्ली : भाजपनेही आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना काही प्रतिसवाल केले. प्रामुख्याने, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा विश्वासघात का केला, अशी विचारणा त्या पक्षाने केली. केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारचा १० वर्षांचा कार्यकाळ भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमतेने व्यापलेला होता.
भ्रष्टाचाराविरोधात बोलण्याचा आणि इतरांना प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार केजरीवाल यांनी गमावला आहे. त्यांनी हजारे यांच्या प्रमाणेच किरण बेदी, कुमार विश्वास यांसारख्या सहकाऱ्यांचाही विश्वासघात केला. प्रतिज्ञा मोडून त्यांनी कॉंग्रेसशी हातमिळवणी केली. लोकपालच्या मुद्द्यावरून काहीच न करत त्यांनी भ्रष्टाचाराबाबत जनतेचा विश्वासघात केला.
केजरीवाल यांची सभा फ्लॉप ठरली. त्यामध्ये जनतेचा सहभाग नव्हता. तर, आपच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. मोठा गाजावाजा करूनही त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले नाहीत. केजरीवाल यांचा राजकीय प्रवास संपण्याच्या मार्गावर आहे, असे दिल्ली भाजपचे अध्यक्ष विरेंद्र सचदेव यांनी म्हटले.
राजकारणात सक्रिय होण्याआधी केजरीवाल यांनी हजारे यांच्या समवेत भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात सहभाग घेतला. मात्र, नंतर त्यांच्यात ताटातूट झाली.





