श्रीनगर – राज्यघटनेचे कलम ३७० हटवून जम्मू-काश्मीरला विकासाच्या मार्गावर आणल्याचा दावा भाजप करत आहे. मग, त्या पक्षाने काश्मीर खोऱ्यात उमेदवार का दिले नाहीत, असा सवाल जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी केला. काश्मीर खोऱ्यात लोकसभेच्या ३ जागा आहेत. त्या तिन्ही जागा न लढवण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. त्यावरून पत्रकारांशी बोलताना उमर यांनी भाजपला लक्ष्य केले. दाव्याप्रमाणे भाजपने मोठी कामगिरी केली असेल; तर एकही उमेदवार रिंगणात का उतरवला नाही, अशी विचारणा त्यांनी केली. आपण कुठे आहोत याची जाणीव असल्यानेच भाजपने उमेदवार दिले नाहीत, असा शाब्दिक टोलाही त्यांनी लगावला. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने कलम ३७० हटवल्याने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्दबातल ठरला. त्याचा संदर्भ देऊन उमर यांनी आमची ओळख आणि आमचे जमीनविषयक हक्क हिसकावून घेण्यात आल्याचा आरोप केला. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला काश्मीरमध्ये किती मतं मिळतात ते पाहू, असे आव्हानही त्यांनी दिले. जम्मू-काश्मीरमध्ये पुढील काही महिन्यांत विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे.