Pimpri News | आळंदीत निवडणुकीबरोबरच कार्तिकी वारीची लगबग

पिंपरी, (प्रतिनिधी) – राज्यभरात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची घाई असतानाच आळंदीत निवडणुकीच्या फिवरबरोबरच कार्तिकीवारीची लगबग पहायला मिळत आहे. या वारीला किमान पाच लाख भाविक येण्याची शक्यता आहे. आळंदी नगरपरिषदेकडील सफाई कर्मचारी व वाहनांची मर्यादित संख्या लक्षात घेता शहराच्या साफसफाईकरिता पिंपरी चिंचवड महापालिकेची मदत घेतली जात आहे. महापालिकेची रोडस्वीपर वाहने व कर्मचारी आळंदीतील रस्त्यांची साफसफाई करताना दिसत आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा (कार्तिकीवारी) सुरू झाला आहे. येत्या 26 तारखेला आळंदी यात्रा आहेत; तर 28 नोव्हेंबरला संजीवन समाधी सोहळा दिन आहे. यंदा राज्यभरात पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने आनंदाचे वातावरण आहे. त्याचा या सोहळ्यावर परिणाम होण्याची शक्यता असून, त्यामुळे भाविकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुले निवडणुकीच्या धामधुमीत आळंदी प्रशासनाकडून या सोहळ्याला येणार्या नागरिकांना सुविधा पुरविण्याची जय्यत तयारी सुरू आहे.
आळंदी नगरपरिषद प्रशासनाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून रस्ते सफाईकरिता वाहने मागविली आहेत. शहरातील दुभाजक असलेले चाकण चौक, वाय जंक्शन, आळंदी-पुणे रस्त्याबरोबरच देहू-आळंदी रस्त्याची यांत्रिक पद्धतीने सफाई पूर्ण झाली आहे. तर आता देहूफाटा ते आळंदी -पुणे रस्त्यावरील रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याशिवाय भाविकांना शहराच्या विविध भागांमध्ये क्रमवारीनुसार चोवीस तास पाणी पुरवठा करण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.





