विमानांचा रंग पांढरा का असतो आणि न्यूझीलंड त्याला अपवाद का आहे? जाणून घ्या….

आपण आकाशात अनेकदा विमान पाहतो. लहानपणी आपल्याला याचे विशेष कौतुक वाटते. आकाशात लुकलुकणारे दिवे पाहून कित्येक काळ आपण त्याकडे पाहतच बसतो. मग विमानाला कसे पंख असतात. ते आकाशात कसे उडते याबाबत आपण वाचतो किंवा ऐकतोही. पण जगातील जवळपास सगळ्या विमानांचा रंग पांढराच का असतो असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय?
बहुतांश विमाने पांढऱ्या रंगात रंगवण्यामागे व्यावहारिक आर्थिक दृष्टिकोन असतो आणि त्याचबरोबर सुरक्षा विषयक कारणे असतात. पांढऱ्या रंगावरून सूर्यकिरणे परावर्तित होतात. त्यामुळे कडक ऊन असते तेव्हा उष्णता कमी करण्यास आणि विमानातील अंतर्गत भाग थंड राखण्यास मदत होते.
रंगांच्या लेयर मध्ये देखील तडे जातात किंवा गंज पकडतो आणि अशावेळी पांढऱ्या रंग असेल तर ते लवकर दिसून येते आणि मग आवश्यक ती देखभाल करणे शक्य होते. खेरीज अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे पांढरा रंग उडण्याची शक्यता खूप कमी असते. अन्य रंग हे अल्ट्राव्हायोलेट किरणांच्या परिणामांमुळे हळूहळू फिके पडत जातात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे निळे आकाशामध्ये पांढऱ्या रंगाचे विमान उठून दिसते आणि त्यामुळे पक्षांना धडक टाळणे शक्य होते.
असे असले तरी एअर न्यूझीलंड या न्यूझीलंड मधील प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपनीची विमाने मात्र काळ्या रंगात असतात. कारण न्यूझीलंडचा तो राष्ट्रीय रंग आहे. त्यामुळे राष्ट्रीय ओळख म्हणून एअर न्यूझीलंडने काळ्या रंगाची निवड केलेली आहे. त्यामुळे आता एअर न्यूझीलंडच्या ताफ्यातील प्रत्येक विमानाला काळा रंग दिलेला असतो.





