Doug Bracewell Ban : न्यूझीलंडच्या स्टार क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी! कोकेन सेवनाचा आरोप सिद्ध; काउंटी क्रिकेटमध्ये ‘डोपिंग’ने खळबळ
Doug Bracewell Ban : या चाचणीत त्याच्या नमुन्यांमध्ये कोकेन आणि त्याच्या मेटाबोलाईट्सचे अंश आढळून आले आहेत.

Doug Bracewell has been banned for two years : खेळ जगतात तंदुरुस्तीसोबतच शिस्त पाळणे अत्यंत महत्त्वाचे असते, मात्र अंमली पदार्थांचे सेवन केल्यामुळे अनेकदा मोठ्या खेळाडूंचे करियर संपुष्टात येते. असाच एक धक्कादायक प्रकार न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज डग ब्रेसवेल याच्याबाबत समोर आला असून, कोकेनचे सेवन केल्याप्रकरणी त्याच्यावर दोन वर्षांची मोठी बंदी घालण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू खेळाडू डग ब्रेसवेल याच्यावर कोकेन (Cocaine) या प्रतिबंधित अंमली पदार्थाचे सेवन केल्यामुळे दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. २०२५ मध्ये इंग्लंडमधील काउंटी चॅम्पियनशिपमध्ये एसेक्स आणि समरसेट यांच्यातील सामन्यादरम्यान ब्रेसवेलची उत्तेजक चाचणी (Dope Test) घेण्यात आली होती. या चाचणीत त्याच्या नमुन्यांमध्ये कोकेन आणि त्याच्या मेटाबोलाईट्सचे अंश आढळून आले आहेत.
डग ब्रेसवेलने दिली कबुली –
Case outcome: Doug Bracewell
➡️ https://t.co/9IKfa57EJJ pic.twitter.com/huQVnyVreQ
— Cricket Regulator (@CricRegulator) April 24, 2026
जागतिक अमली पदार्थ विरोधी संस्था (WADA) आणि इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाच्या (ECB) नियमांनुसार, खेळाडूंना स्पर्धेदरम्यान कोणत्याही नशिली पदार्थाचे सेवन करण्यास सक्त मनाई आहे. ब्रेसवेलने स्वतः कबूल केले आहे की, त्याने २४ सप्टेंबर २०२५ च्या रात्री आणि २५ सप्टेंबरच्या पहाटे कोकेनचे सेवन केले होते. त्याच्याकडे या पदार्थाचा उपचारासाठी वापर करण्याची कोणतीही अधिकृत परवानगी (TUE) नव्हती. परिणामी, त्याच्यावर २४ नोव्हेंबर २०२५ पासून २३ नोव्हेंबर २०२७ पर्यंत ही बंदी लागू करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आधीच निवृत्ती –
३४ वर्षीय डग ब्रेसवेलने २०२३ च्या अखेरीस आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता आणि त्यानंतर तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्याने न्यूझीलंडसाठी ६९ आंतरराष्ट्रीय सामन्यांत १२० विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे, ब्रेसवेल आयपीएलमध्येही खेळला आहे. निवृत्ती घेतली असली, तरी या बंदीमुळे त्याला आता क्रिकेटशी संबंधित कोणत्याही अधिकृत उपक्रमात, प्रशिक्षणात किंवा मार्गदर्शकाच्या भूमिकेत सहभागी होता येणार नाही.





