शिवाजी पार्कवर वैचारिक भंगार ऐकायला कोण जाणार? दसरा मेळाव्यावरून CM शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

मुंबई – यंदाच्या दसरा मेळाव्याच्या सभेसाठी शिवाजी पार्क मैदानावरून शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पडणार असल्याचे चित्र दिसत होते. मात्र, शिंदे गटाने शिवाजी पार्क मैदानासाठीचा अर्ज मागे घेतला आहे.
त्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदे यांनी आता ठाकरे गटावर हल्लाबोल केला आहे. बाळासाहेबांच्या पवित्र विचारांनी भारावलेले शिवतीर्थ गेल्याच वर्षी या मंडळींनी बाटवले आहे.
आम्ही ठरवले असते तर या मैदानावर सभा घेतलीही असती. परंतु, राज्याचा प्रमुख म्हणून मला कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणायची नव्हती, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
शिंदेंनी दसरा मेळाव्यासाठी नवे पर्याय शोधले असून शिवाजी पार्कवरचा दावा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, मुंबई महापालिकेकडून आता ठाकरे गटाला परवानगी मिळण्याची शक्यता आहे.
परवानगीसाठीचा अर्ज मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्वीटरवर आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचा बुलंद आवाज ज्या शिवाजी पार्कवर शिवसैनिकांनी ऐकला,
ज्या मैदानातून शिवसेनाप्रमुखांनी कॉंग्रेसला गाडण्याचा विचार मांडला, ज्या मैदानातून प्रखर हिंदुत्वाचा जागर त्यांनी केला, त्याच मैदानातून कॉंग्रेसला डोक्यावर घेतले जाणार असेल तर तो शिवसेनेचा दसरा मेळावा असूच शकत नाही.
बाळासाहेबांच्या पवित्र विचारांनी भारावलेले शिवतीर्थ गेल्याच वर्षी या मंडळींनी बाटवले. आम्ही ठरवले असते तर या मैदानावर सभा घेतलीही असती. परंतु, राज्याचा प्रमुख म्हणून मला कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणायची नव्हती, अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली.





