Pune | येत्या काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांमध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहेत. भारतीय जनता पक्षात देखील स्थानिकपासून ते थेट पक्षातील उच्च पदापर्यंत अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात महायुतीची सत्ता पुन्हा एकदा आल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मंत्रीपदी वर्णी लागली. यानंतर हे पद रिक्त झाले. भाजपने प्रदेश कार्याध्यक्ष या पदावर माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांची नियुक्ती केली. त्यांची नियुक्ती झाल्यानंतर पक्षात अनेक मोठे बदल करण्यात आले. त्यामध्ये पुण्याच्या शहराध्यपदाचाही समावेश आहे. या पदासाठी अनेकजण इच्छुक असून पक्षनेतृत्व कोणाला संधी देणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. भाजपच्या मागील तीन वर्षांमध्ये तीन अध्यक्ष पाहता मराठा आणि ब्राम्हण या समाजाला प्राध्यान्य दिल्याचे दिसते. यंदा मात्र, भाजप ओबीसी नेत्यावर पुणे भाजप शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवू शकते, अशी चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याची माहिती आहे. सध्या पुणे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे हे आहेत. त्यांच्या पदाचा कार्यकाळ काही दिवसांनंतर समाप्त होणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर भाजपच्यावतीने स्थानिक होल्ड मजबूत करण्यासाठी सदस्यत्व नोंदणीची मोहिम वेगाने राबवली जात आहे. या मोहिमेचे नेतृत्व कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे आहे. पुण्यातही मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी मोहिम राबविली जात असून त्याचे पक्षस्तरावर कौतुक केले जात आहे. नुकतीच मुंबईत भाजपची एक बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सह-संघटनमंत्री शिवप्रकाश आणि प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंदक्रांत पाटील, माधुरी मिसाळ, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार विक्रांत पाटील, राजेश पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार भीमराव तापकीर, आमदार हेमंत रासने, दिलीप कांबळे, जगदीश मुळीक आदी उपस्थित होते. या बैठकीत प्राथमिक सदस्यत्व नोंदणीही मोठ्या संख्येने झाल्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. पक्षाकडून मंडलाध्यक्ष निवडीवरही या वेळी चर्चा झाली. या ओबीसी नावांची चर्चा भाजमध्ये ओबीसे नेत्याला शहराध्यक्ष पदाची संधी दिली जाऊ शकते. यासाठी वरिष्ठ पातळीवर वेगाने हालचाली घडत आहेत. या चेहऱ्यांमध्ये आमदार योगेश टिळेकर, हेमंत रासने, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, गणेश बीडकर यांच्या नावाची चर्चा आहे.