मुंबई – काही दिवसांपुर्वी एका मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी महाराष्ट्रासाठी भांडण बाजूला सारुन उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येण्यास तयार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील एका कार्यक्रमात दोन्ही भावांमध्ये भांडण काही नव्हतच म्हणत राज ठाकरेंना सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यामुळे दोन्ही ठाकरे एकत्र येणार अशा चर्चांना उधाण आले होते. विशेष म्हणजे दोन्ही गटांकडून दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावे यासाठी आवाहन देखील करण्यात येत होते. यावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दोन भाऊ एकत्र येणार, दोन पक्ष एकत्र येणार. ही चर्चा चालू कुणी केली असे म्हणताना माध्यमांनाच आरोपींच्या पिंजऱ्यात उभे केले. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा मी तुमच्या माध्यमांमध्येच बघतोय की, दोन भाऊ एकत्र येणार, दोन पक्ष एकत्र येणार. ही चर्चा चालू कुणी केली?, असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला. मीदेखील राज ठाकरेंची ती मुलाखत बघितली. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, आमच्या कुठल्याही भांडणापेक्षा महाराष्ट्राचे प्रश्न मोठे आहेत. याचा अर्थ आम्हाला शिवसेना-मनसे पक्ष एकत्र येत आहेत, अशा संबंधात कोणतीही वाक्य त्यांनी म्हटलेली नाहीत. मी तरी तसे काही पाहिले नाही. पण राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा कुणी काय अर्थ काढावा हा लोकशाहीने दिलेला प्रत्येकाला अधिकार आहे, अशी भूमिका संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केली. महाराष्ट्राचा एखादी समस्या असेल, महाराष्ट्राचा एखादा प्रश्न असेल तर त्यासाठी एकत्र येण्याबाबतचा विषय होता. एवढा मोठा विचार त्यांच्या मुलाखतीत होता. याचा अर्थ युती होते, एकत्र निवडणुका लढवूया असा अर्थ तर माध्यमे काढत असतील. कुणी काय अर्थ काढावा हा प्रत्येकाचा अधिकार आहे. तुम्ही जो अर्थ काढताय तोच मी काढावा, असे होऊ शकत नाही, असे संदीप देशपांडे म्हणाले.