शांत झोप कुणाला लागणार? अजित पवार इंदापूरमध्ये पुन्हा लक्ष देणार?

– नीलकंठ मोहिते

इंदापूर  – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतून सक्षम उमेदवार नाहीत या कारणास्तव माघार घेतल्यामुळे अखेर हा साखर कारखाना बिनविरोध भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात गेला; परंतु कारखान्याचा निवडणूक प्रोग्रॅम संपताच, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी ”

“मी भाजपमध्ये गेल्यामुळे शांत झोप लागते”. असे वक्तव्य करून, राष्ट्रवादी कॉंग्रेस व अन्य राजकीय पक्षांना विनाकारण डिवचले. त्यामुळे सध्याचे महाविकास आघाडीचे सरकार आगामी काळात इंदापूर तालुक्‍यामध्ये कोणाला शांत झोपवणार, तर कुणाला शांत झोप लागणार याकडे तालुक्‍यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर आगपाखड त्यांनी केली होती. आपण भाजपमध्ये केवळ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या त्रासामुळे जातो आहे, असे चित्र पाटील यांनी त्यावेळी उभे केले होते; परंतु मागील आठवड्यात तालुक्‍याबाहेरील एका कार्यक्रमात राजकीय कोणताही हंगाम नसताना, अचानक ”

“मी भाजप पक्षात गेल्यामुळे कोणत्याही चौकशा सुरू नाहीत, त्यामुळे शांत झोप लागते.” असे वक्तव्य करून, पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अंगावर घेतले आहे. हे वक्तव्य करून एक दिवस होत नाही तोपर्यंत, माझ्या बोलण्याचा अर्थाचा अनर्थ काढू नका, अशी सारवासारव हर्षवर्धन पाटील यांनी केली. मात्र तोपर्यंत थेट मुंबई येथील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातून याच शब्दाचा धागा पकडत, हर्षवर्धन पाटील यांना टीकेला सामोरे जावे लागले.

एवढेच काय; परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवारदेखील या शब्दावर बोलले. राज्यभरातून हर्षवर्धन पाटील यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला जात आहे. त्यामुळे विनाकारण हर्षवर्धन पाटील राज्यभर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मला शांत झोप लागते, या शब्दाचा अर्थ तसेच भाजप प्रवेश, असे गणित सामान्यांपर्यंत पोचलेले दिसते.

पमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातलगांच्या साखर कारखाना संदर्भात चौकशा सुरू आहेत. एकतर उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे विळा – भोपळ्याचे नाते सर्वश्रुत आहे. त्यातच या वक्तव्याची भर पडली असल्यामुळे आगामी सर्व निवडणुकीमध्ये तसेच इतर कामकाजात उपमुख्यमंत्री अजित पवार इंदापूर तालुक्‍यावर अधिकचे लक्ष ठेवणार. हे प्रत्येक पक्षातील वरिष्ठ कार्यकर्ते खुलेआमपणे बोलून दाखवत आहेत.

राज्यातील महत्त्वाच्या पाच ते सहा खात्यांची जबाबदारी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे असतानादेखील तालुक्‍यातील सामान्य जनते प्रश्‍न सोडविण्यासाठी ते काम करताना झगडताना दिसत आहेत. विकासाचा डोंगर करोना परिस्थिती असतानाही इंदापूर तालुक्‍यातील गावागावात निर्माण झाला आहे. त्यामुळे राजकारणात आगामी काळात कोण कोणाला झोपवणार, यावर देखील विचार मंथन होऊ लागले आहे.

राजकीय फायदा कोणाला?
काही दिवसांवरच इंदापूर नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद व इतर संस्थांच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. उलट सरकारमध्ये राज्यमंत्री भरणे असताना कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखाना बिनविरोध करण्यासाठी हर्षवर्धन पाटील यशस्वी ठरले. याचा राजकीय फायदा हर्षवर्धन पाटील यांनी उठवणे अपेक्षित असताना, नको ते वक्तव्य करून राजकारणातील झोप उडवण्याचे शब्द वापरल्यामुळे उलटसुलट चर्चांना वेग आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.