सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? वाचा संपूर्ण कुंडली; घटनेनंतर CJI गवई काय म्हणाले….

CJI Gavai Supreme Court Shoe Attack | Rakesh Kishore : आज सर्वोच्च न्यायालयात खळबळजनक घटना घडली आहे. भारताचे सरन्यायाधीश (CJI) बी.आर. गवई यांच्यासमोर एका वकिलाने कोर्टरूममध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. एवढेच नाही तर वकिलाने सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्नही केला असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर पोलिसांनी आरोपी वकिलाला ताबडतोब ताब्यात घेतले.
पोलीस त्यांना बाहेर काढत असताना, वकिलाने सांगितले की, “भारत सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही.” दरम्यान, संपूर्ण घटनेत न्यायमूर्ती गवई शांत राहिले आणि न्यायालयीन कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहिले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी तातडीने कारवाई केली आणि न्यायालयाच्या आवारात सुरक्षा वाढवली.
सरन्यायाधीश गवई काय म्हणाले? पहिली प्रतिक्रिया…
सीजे गवई यांनी याविषयी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या घटनेविषयी बोलताना, ”या घटनेने आपल्याला फारसा फरक पडत नाही” असे म्हणाले आहेत. कोर्टातून बाहेर पडताना वकिलाने ओरडून म्हटले की, “भारत सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही.”
तथापि, सीजेआय गवई यांनी घटनेकडे फारसे लक्ष दिले नाही आणि वकिलांना त्यांचे युक्तिवाद सुरू ठेवण्यास सांगितले. त्यांनी वकिलांना सांगितले की, “या सर्व गोष्टींमुळे विचलित होण्याची गरज नाही. आम्ही त्यामुळे विचलित होत नाही. अशा गोष्टींचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही.”असे त्यांनी म्हटले आहे.
सरन्यायाधीशांवर बुट फेकणाऱ्या वकिलाची कुंडली समोर :
‘राकेश किशोर’ असे या वकिलाचे नाव आहे. ते ७१ वर्षांचे असून कोर्टात वकिलीचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. सुप्रीम कोर्टात वकील आणि क्लार्कसाठी दिले जाणारे कार्डही या वकिलाकडे होते. एका वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश किशोर हे सुप्रीम कोर्टातील बारचे २०११ पासूनच सदस्य आहेत. ते कोर्टातील ज्येष्ठ वकील म्हणून परिचित आहेत. या राकेश किशोरच्या विरोधात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
न्यायालयीन शिष्टाचाराच्या या गंभीर उल्लंघनाला प्रतिसाद म्हणून, बार कौन्सिल ऑफ इंडियाने शिस्तभंगाची कारवाई सुरू केली. या कृत्याला न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यावर आणि प्रतिष्ठेवर थेट हल्ला असल्याचे म्हणत, बीसीआयने राकेश किशोर यांना संपूर्ण चौकशी होईपर्यंत अनिश्चित काळासाठी वकिली करण्यापासून निलंबित करण्याचा आदेश पारित केला. कौन्सिलने या कृत्याचा निषेध केला, असे अधोरेखित केले की असे वर्तन कायदेशीर व्यावसायिकाचे अयोग्य आहे आणि संपूर्ण कायदेशीर समुदायाची बदनामी करते.
विष्णू मंदिरासंदर्भातील ते प्रकरण काय होतं? वाचा सविस्तर…
मध्यप्रदेशमधील प्रसिद्ध खजुराहो मंदिर परिसरातील जावरी मंदिरातील सात फूट उंच भगवान विष्णूची शीर नसलेली मूर्ती हटवून त्या ठिकाणी भगवान विष्णूची नवी मूर्ती बसवावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात १७ सप्टेंबर रोजी फेटाळून लावली होती. न्यायालयाने स्पष्ट केलं की हे प्रकरण पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या (एएसआय) अखत्यारित येतं.
सरन्यायाधीशांनी काय टिप्पणी केली होती?
सरन्यायाधीश बी. आर. गवई त्यावेळी म्हणाले होते की “तुम्ही इथून जा आणि भगवान विष्णूकडेच प्रार्थना करा आणि त्यालाच काहीतरी करायला सांगा. तुम्ही असं म्हणताय की तुम्ही भगवान विष्णूचे भक्त आहात. मग भगवान विष्णूलाच काहीतरी करायला सांगा. कारण ते (खजुराहो मंदिर) पुरातत्व विभागाच्या अखत्यारित येणारं स्थळ आहे. पुरातत्व विभागाच्या परवानगीशिवाय तिथे काही करता येत नाही. तिथे काहीही करायचं असेल तर एएसआयची परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे आम्ही या प्रकरणात दखल देऊ शकत नाही, याबाबत आम्हाला खेद वाटतो.”
मी सर्व धर्मांचा आदर करतो : सरन्यायाधीश गवई
खजुराहो येथील जावरी मंदिरात भगवान विष्णूची मूर्ती बसवण्याची मागणी करणारी याचिका फेटाळण्यात केलेल्या टिपण्णीवर सोशल मीडियावर उमटलेल्या टीकात्मक प्रतिक्रियांची सरन्यायाधीश गवई यांनी दखल घेतली होती. ते म्हणाले होते की, “कोणीतरी मला सांगितले की मी याचिका फेटाळताना केलेल्या केलेल्या टिप्पण्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. मी सर्व धर्मांचा आदर करतो.” असं ते म्हणाले.





