Thackeray brothers : महाराष्ट्र गीत सुरु असताना…; ज्युनिअर ठाकरे बंधूंचा व्हिडिओ व्हायरल; भाजपची बोचरी टीका
Thackeray brothers : गुरुवारी संध्याकाळी लालबाग सेंटर पॉइंटजवळून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी बसेस सोडण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Thackeray brothers : सोशल मीडियावर आमदार आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांचा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र गीत सुरू असताना दोन्ही ठाकरे बंधू एकाच ठिकाणी उभे नसल्याचे दिसत असल्याचा दावा केला जात आहे. यावरून भाजपने ठाकरे बंधूंवर जोरदार निशाणा साधला आहे.
गुरुवारी संध्याकाळी लालबाग सेंटर पॉइंटजवळून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी बसेस सोडण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आमदार आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र गीत सुरू असताना दोघेही एकाच जागी उभे नसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओवर भाजपचे प्रवक्ते आणि नगरसेवक नवनाथ बन यांनी एक्सवर पोस्ट करत ठाकरे बंधूंवर टीका केली. ते म्हणाले “मराठी माणसाच्या नावाने राजकारण करायचं आणि प्रत्यक्षात महाराष्ट्राचाच अपमान करायचा, हीच ठाकरे बंधूंची नवी कार्यपद्धती!”
“राज्यगीत सुरू असताना साधं एकाच जागी उभं राहण्याचं भानही राहू नये? महाराष्ट्राच्या अस्मितेच्या गप्पा मारणाऱ्यांकडूनच राज्यगीताचा असा अवमान होत असेल, तर हा महाराष्ट्राचा अपमान नाही का?” असा सवालही नवनाथ बन यांनी उपस्थित केला आहे.
मराठी माणसाच्या नावाने राजकारण करायचं आणि प्रत्यक्षात महाराष्ट्राचाच अपमान करायचा हीच ठाकरे बंधूंची नवी कार्यपद्धती!
राज्यगीत सुरू असताना साधं एकाजागी उभं राहण्याचं भानही राहू नये? महाराष्ट्राच्या अस्मितेच्या गप्पा मारणाऱ्यांकडूनच राज्यगीताचा असा अवमान होत असेल, तर हा… pic.twitter.com/zhultmGN6c
— Navnath Kamal Uttamrao Ban (@NavnathBanBJP) September 11, 2026
पुढे त्यांनी म्हटलं की, “मराठी माणूस, महाराष्ट्र आणि मराठी अस्मितेचा ठेका घेत फिरणाऱ्यांनी आधी राज्यगीताचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा सन्मान कसा करायचा, हे शिकावं. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंचं मराठी आणि महाराष्ट्र प्रेम केवळ राजकारणासाठी आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.”
दरम्यान, मनसे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर यांच्या संकल्पनेतून दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी लालबाग येथून मोफत एसटी बससेवा उपलब्ध करून दिली जाते. खेड, चिपळूण, महाड, रत्नागिरी, मालवण आणि कुडाळ या ठिकाणी या बसेस जातात.
याच उपक्रमांतर्गत गुरुवारी संध्याकाळी लालबाग सेंटर पॉइंटजवळ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कोकणात जाणाऱ्या एसटी बसेसना हिरवा कंदील दाखवण्यासाठी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे उपस्थित होती. मात्र, महाराष्ट्र गीत सुरू असतानाचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.





