Rahul Gandhi : ‘रायबरेली की वायनाड’ कोणता मतदार संघ सोडणार? राहुल गांधी थेट बोलले….

Lokshabha Elections 2024 । Rahul Gandhi – नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत वायनाड आणि रायबरेली लोकसभा या दोन ठिकाणाहून विजयी झालेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे की यापैकी कोणता मतदार संघ सोडायचा हा माझ्यापुढे पेच निर्माण झाला आहे.
मात्र आपण जो काही निर्णय घेऊ त्याचा दोन्ही मतदारसंघांना आनंद होईल, असे वेगळे संकेतही त्यांनी दिले आहेत. लोकसभेत दुसऱ्यांदा निवडून दिल्याबद्दल त्यांनी वायनाडच्या जनतेचे आभार मानले आणि म्हणाले, की मी लवकरच तुमच्या भेटीसाठी उत्सुक आहे.
विजयानंतर वायनाड मतदार संघात पहिल्यांदाच आलेले राहुल गांधी यांनी येथे रोड शो करून मतदारांचे आभार मानले तसेच एक स्वतंत्र जाहीरसभाही घेतली.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील लढा हा भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी होता आणि त्या लढ्यात द्वेषाचा प्रेम आणि आपुलकीने, अहंकाराचा नम्रतेने पराभव झाल्याचेही त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
पंतप्रधान मोदींना आता आपला दृष्टिकोन बदलावा लागेल, कारण भारतातील जनतेने त्यांना स्पष्ट संदेश दिला आहे, असेही गांधी म्हणाले. राहुल गांधी यांनी केंद्रात स्थापन झालेल्या सरकारचा उल्लेख ‘पंगू’ असा केला.
मोदींप्रमाणे मला ईश्वराकडून संदेश येत नाहीत!
यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान मोदींना देवाकडून जसे संदेश मिळतात तसे मला मिळत नाहीत, त्यामुळे दोन पैकी केाणता मतदार संघ सोडायचा हा माझ्यापुढे पेच निर्माण झाला आहे.
मोदींची खिल्ली उडवत राहुल गांधी म्हणाले की, देवाने पंतप्रधानांना देशातील सर्व प्रमुख विमानतळ आणि वीज प्रकल्प अदानीकडे सोपवण्याचे निर्देश दिले आहेत.
पण, मी एक माणूस आहे. माझा देव देशातील गरीब जनता आहे. त्यामुळे माझ्यासाठी हे सोपे आहे. मी फक्त लोकांशी बोलतो आणि ते मला काय करायचे ते सांगतात,असे गांधी म्हणाले.





