Paris Olympics 2024 : मनू-श्रीजेश असतील ध्वजवाहक..! जाणून घ्या, पॅरिस ऑलिम्पिकचा समारोप समारंभ भारतात कधी, कसा आणि कुठे पाहता येणार….

Paris Olympics 2024 Closing Ceremony : पॅरिस ऑलिम्पिक 26 जुलै रोजी सुरू झाले, ज्याचा उद्घाटन समारंभ जगभरात चर्चेचा विषय बनला. आता हे खेळ संपणार आहेत, त्याचा समारोप सोहळा 12 ऑगस्ट रोजी होणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दहा हजारांहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. भारतातून एकूण 117 खेळाडूंनी भाग घेतला आणि एकूण 6 पदके जिंकली. पॅरिस ऑलिम्पिकचा समारोप सोहळा स्टेड डी फ्रान्स स्टेडियमवर होणार आहे. या कार्यक्रमाला ‘रेकॉर्ड्स’ असे नाव देण्यात आले असून फ्रेंच थिएटर डायरेक्टर आणि अभिनेता थॉमस जोली हा सर्व समारंभ सोहळ्याची देखरेख करणार आहे.
यावेळी समारोप समारंभाला होईल सुरुवात…
समारोप समारंभ कार्यक्रमाची सुरूवात ऑलिम्पिक मशाल विझवून होईल. त्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे प्रमुख थॉमस बाख आणि आयोजन समितीचे अध्यक्ष टोनी एस्टँग्युएट यांची भाषणे होणार आहेत. भारतीय वेळेनुसार (सोमवार) मध्यरात्री 12:30 वाजता (12 August, 12.30 AM) समारोप समारंभ सुरू होईल. हा कार्यक्रम दोन तास तीस मिनिटे चालणार आहे.
भारतात ‘या’ वाहिन्यांवर लाईव्ह पाहू शकता सोहळा…
पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या समारोप समारंभाचे भारतात स्पोर्ट्स 18 वन SD आणि स्पोर्ट्स 18 वन HD वर थेट प्रक्षेपण केले जाईल. भारतात तुम्ही या चॅनेल्सवर समारोप समारंभ लाईव्ह पाहू शकता. भारतात डिजिटल अनुभवासाठी समापन सोहळा JioCinema वर पाहता येईल. लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्हाला Jio Cinema ॲपवर मोफत दाखवले जाईल. यासाठी तुम्हाला फक्त डेटा खर्च करावा लागेल. तसेच डिडी स्पोर्टसवरही हा सोहळा तुम्ही पाहू शकता.
Paris bids adieu with a spectacular celebration! Don’t miss the closing ceremony that promises to be as historic as the Games themselves.
🗓️ August 12 ⏰ 12:30 AM onwards..
Watch LIVE on DD Sports 1.0 📺 (DD Free Dish)#Paris2024 #Cheer4Bharat #Olympics pic.twitter.com/IqRJJWw623
— Doordarshan Sports (@ddsportschannel) August 11, 2024
कोणते कार्यक्रम होणार?
समारोप समारंभाच्या आयोजकांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, पॅरिस ऑलिम्पिकच्या समारोप समारंभात 100 हून अधिक कलाकार परफॉर्म करणार आहेत. यामध्ये ॲक्रोबॅट्स, नर्तक आणि सर्कस कलाकारांचाही समावेश असेल. एक संगीत कॉन्सर्ट होईल ज्यामध्ये स्नूप डॉग, सेलीन डीओन, बिली इलिश आणि रेड चिली पेपर्स नावाचा रॉक बँड देखील सादरीकरण करतील.
जुन्या परंपरेनुसार, 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकच्या आयोजकांना समारोप समारंभात ऑलिम्पिक ध्वज देण्यात येईल. याशिवाय अमेरिकन संगीतकार गॅबी विल्सन (‘HER’) अमेरिकेचे राष्ट्रगीत गाताना दिसणार आहे. उद्घाटन सोहळ्याप्रमाणेच एक माहितीपटही दाखवण्यात येणार असून, त्यात भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळाची झलक दाखवण्यात येणार आहे. परफॉर्मन्स आकाशातही पाहायला मिळणार आहे.
मनू भाकर आणि पीआर श्रीजेश असतील ध्वजवाहक…
समारोप समारंभात मनू भाकर आणि हॉकी संघाचा गोलरक्षक पीआर श्रीजेश भारतीय संघाचे ध्वजवाहक असतील. युवा नेमबाज मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत दोन कांस्यपदके जिंकून इतिहास रचला आहे. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती भारताची पहिली महिला खेळाडू आहे. पीआर श्रीजेशने भारतीय हॉकी संघाला कांस्यपदक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.





