Paris Olympics 2024 Closing Ceremony : पॅरिस ऑलिम्पिक 26 जुलै रोजी सुरू झाले, ज्याचा उद्घाटन समारंभ जगभरात चर्चेचा विषय बनला. आता हे खेळ संपणार आहेत, त्याचा समारोप समारंभ 11 ऑगस्ट रोजी होणार आहे. लक्षात घ्या की, उद्घाटन समारंभाच्या वेळी सीन नदीवर अॅथलीट्सची परेड आयोजित करण्यात आली होती. आता समारोप सोहळाही त्याच पद्धतीने होणार का, असा प्रश्न क्रीडाप्रेमींच्या मनात निर्माण होत आहे. अखेर हा समारोप सोहळा कधी सुरू होणार आणि त्यात कोणत्या खास गोष्टी पाहायला मिळतील? या सर्व प्रश्नांची उत्तरे एकत्रित जाणून घेऊया….
कधी आणि कुठे होणार समारोप समारंभ?
पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा समारोप समारंभ फ्रान्समधील सर्वात मोठे स्टेडियम स्टेड डी फ्रान्समध्ये होणार आहे. या स्टेडियममध्ये एकाच वेळी 80 हजार लोक बसू शकतात. हा सोहळा भारतात 12 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12:30 वाजता सुरू होईल, जो किमान 2 तास चालेल अशी अपेक्षा आहे.
काय-काय होणार?
समारोप समारंभाच्या आयोजकांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, पॅरिस ऑलिम्पिकच्या समारोप समारंभात 100 हून अधिक कलाकार परफॉर्म करणार आहेत. यामध्ये ॲक्रोबॅट्स, नर्तक आणि सर्कस कलाकारांचाही समावेश असेल. एक संगीत कॉन्सर्ट होईल ज्यामध्ये स्नूप डॉग, सेलीन डीओन, बिली इलिश आणि रेड चिली पेपर्स नावाचा रॉक बँड देखील सादरीकरण करतील.
जुन्या परंपरेनुसार, 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकच्या आयोजकांना समारोप समारंभात ऑलिम्पिक ध्वज देण्यात येईल. याशिवाय अमेरिकन संगीतकार गॅबी विल्सन (‘HER’) अमेरिकेचे राष्ट्रगीत गाताना दिसणार आहे. उद्घाटन सोहळ्याप्रमाणेच एक माहितीपटही दाखवण्यात येणार असून, त्यात भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळाची झलक दाखवण्यात येणार आहे. परफॉर्मन्स आकाशातही पाहायला मिळणार आहे.
समारोप समारंभात सार्मिएन्टोचे गायन
पॅरिस ऑलिम्पिकच्या समारोप समारंभात पाच वेळा ग्रॅमी विजेती आणि ‘हर’ म्हणून प्रसिद्ध असलेली गॅब्रिएला सार्मिएन्टो विल्सन परफॉर्म करताना दिसणार आहे. 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी ‘हँडओव्हर’चा भाग म्हणून ती स्टेड डी फ्रान्समध्ये अमेरिकेचे राष्ट्रगीत गाणार आहे. ‘हर’ने तिच्या शानदार कारकिर्दीत ऑस्कर, एमी आणि ग्रॅमी पुरस्कार पटकावले आहेत. 27 वर्षीय कॅलिफोर्नियाच्या गायिकेने 2021 चा ग्रॅमी पुरस्कार ‘आय कान्ट ब्रीद’ साठीच्या सॉन्ग ऑफ द इयर जिंकला. 1984 आणि 1932 नंतर 2028 मध्ये लॉस एंजेलिस तिसऱ्यांदा ऑलिम्पिकचे आयोजन करणार आहे. हे शहर प्रथमच पॅरालिम्पिकचे आयोजनही करणार आहे.
भारताचे ध्वज वाहक…
उद्घाटन समारंभाच्या वेळी पीव्ही सिंधू आणि शरथ कमल यांना भारतीय संघाचे ध्वजवाहक बनवण्यात आले होते. समारोप समारंभात भारतीय संघाचे ध्वजवाहक मनू भाकर आणि पीआर श्रीजेश असतील. भाकरने 2024 ऑलिम्पिकमध्ये 2 कांस्यपदके जिंकली आहेत, तर पीआर श्रीजेश कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचा एक भाग होता आणि त्याने यादरम्यान हाॅकीतून निवृत्ती देखील जाहीर केली आहे. भारतीय हॉकी संघाने सलग दुसऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकून इतिहास रचला आहे.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 चे भारताच्या पदक विजेत्यांची नावे
1. नीरज चोप्रा : रौप्यपदक (अॅथलेटिक्स भालाफेक)
2. मनु भाकर : कांस्यपदक (10 मी एअर पिस्तूल नेमबाजी)
3. मनू भाकर-सरबज्योत सिंग : कांस्यपदक (मिश्र संघ, 10 मी एअर पिस्तूल नेमबाजी)
4. स्वप्नील कुसाळे : कांस्यपदक (50 मी रायफल 3 पोझिशन, नेमबाजी)
5. भारतीय हॉकी संघ : कांस्यपदक(पुरुष, हॉकी)
6. अमन सेहरावत : कांस्यपदक (57 किलो कुस्ती,पुरुष)
पदकतालिकेत भारत 69 व्या स्थानी
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील पदकतालिकेत भारत 1 रौप्य आणि 5 कांस्यपदकासह 69 व्या स्थानावर आहे. तर पाकिस्तान एका सुवर्णापदकासह 59 व्या स्थानावर आहे. चायना (35 सुवर्ण, 27 रौप्य, 23 कांस्य) पहिल्या स्थानावर , अमेरिका (33 सुवर्ण, 41 रौप्य, 39 कांस्य) दुसऱ्या, आणि आस्ट्रेलिया (18 सुवर्ण,16 रौप्य, 14 कांस्य) तिसऱ्या स्थानावर आहे.