“इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर निवडणूक आयोगाला…”; राहुल गांधी स्पष्टच बोलले
पाटणा – लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावरील शाब्दिक हल्ल्याची धार आणखी वाढवली. आम्हाला थोडा अवधी द्या. प्रत्येक मतदारसंघातील मतचोरी आम्ही पकडू आणि जनतेपुढे मांडू. त्यानंतर संपूर्ण देश निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र मागेल, असा इशारा त्यांनी दिला.
विरोधकांनी निवडणुकांमधील कथित अनियमितता, मतचोरीविरोधात एल्गार पुकारला आहे. त्यामध्ये राहुल आघाडीवर आहेत. त्यांनी बिहारमध्ये मतदार अधिकार यात्रा सुरू केली आहे. त्या यात्रेच्या प्रारंभाच्या दिवशी म्हणजे रविवारी निवडणूक आयोगाने दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राहुल यांना आव्हान दिले. मतचोरीच्या आरोपांविषयी ७ दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करा; अन्यथा देशाची माफी मागा, असे कुमार यांनी म्हटले.
त्यावर राहुल यांनी यात्रेदरम्यानच्या मेळाव्यात प्रत्युत्तर दिले. एक दिवस बिहारमध्ये आणि केंद्रात आमच्या इंडिया आघाडीचे सरकार येईल. त्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर दोन आयुक्तांविरोधात आम्ही कारवाईचे पाऊल उचलू. त्यांनी संपूर्ण देशातून मतांची चोरी केली आहे, असे ते म्हणाले. मी व्यासपीठावरून कधीच खोटे बोललो नाही. जे मी बोलतो; ते करतो, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.





