मुंबई तुंबली तेव्हा दिघे सर्वांच्या स्वप्नात, विचारलं एकनाथ कुठेय ? संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई : मुंबईत मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पाणी तुंबण्याच्या परिस्थितीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “मुंबई तुंबली तेव्हा आनंद दिघे अनेकांच्या स्वप्नात गेले, विचारलं एकनाथ कुठे आहे?” असा हल्लाबोल खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला.
तसेच एकनाथ शिंदे नगरविकासमंत्री असूनही मुंबईतील पाणी तुंबण्याच्या समस्ये कडे दुर्लक्ष करत आहेत आणि अमित शहा यांच्या लांगूलचालनात व्यस्त आहेत, अशी टीकाही राऊत यांनी यावेळी केली.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत म्हणाले, अमित शाह आहेत कोण? देशावर लादलेले गृहमंत्री आहेत ठीक आहे. मुंबईत काल महापूर आला. ही जबाबदारी कोणाची आहे तर एकनाथ शिंदेंची आहे. ते नगरविकासमंत्री आहेत. महापालिका कोणाकडे आहे? मुंबई तुंबली तेव्हा आनंद दिघे अनेकांच्या स्वप्नात गेले, विचारलं एकनाथ कुठे आहे? मुंबई आणि ठाणे बुडालं एकनाथ कुठंय? एकनाथ शिंदे अमित शाहांचं लांगुणचालन करण्यात व्यस्त आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
पुढे म्हणाले, एकनाथ कुठंय तर महाराष्ट्र द्रोह्यांच्या लांगुणचालनात आहे. अमित शाहांनी आम्हाला सांगू नये. हे शेअर बाजारातील दलाल आहेत. त्यांना मुंबई जुगारावर लावायची आहे. भारतीय जनता पक्ष व्यापारांचा पक्ष आहे. हा शेठजींचा पक्ष आहे. शेठजींनी मुंबई आणि महाराष्ट्राचं भवितव्य ठरवू नये, असं राऊत म्हणाले.
तसेच, साडेतीन वर्ष सत्ता कोणाच्या ताब्यात आहे. काही झालं की, पंडित नेहरु आणि मनमोहन सिंग यांचं नाव काढता. अरे दहा वर्ष तुमच्या हातात सत्ता आहे. साडेदहा वर्षे मोदी-शाहांच्या हातात सत्ता आहे. मुंबईची सत्ता साडेतीन वर्ष झाले शिंदे आणि फडवणीसांच्या हातात आहे. मोठा गाजावाज करत मुंबईतील भुयारी मेट्रोचं उद्घाटन केलं. काल जनतेचे हजारो कोटी बुडाले, असं संजय राऊत यांनी म्हंटल आहे.
एकनाथ शिंदेकडून प्रशासनाला दक्ष राहण्याचे निर्देश
या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर दक्ष राहण्याचे आणि मदतकार्य तत्काळ राबवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे, विशेषत: नद्या, नाले व जलाशयांच्या परिसरात राहणाऱ्यांनी अधिक काळजी घेण्याचे सांगितले आहे. दरम्यान, या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर, मुंबईतील पावसामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर सरकारने तात्काळ आणि प्रभावी उपाययोजना राबवण्याची गरज आहे.





