भूकंपग्रस्त म्यानमारच्या मदतीसाठी भारताकडून राबवले जाणारे ‘ऑपरेशन ब्रह्मा’ काय आहे? या नावाचा अर्थ काय? वाचा

India Launches ‘Operation Brahma’ | म्यानमारमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपातील जीवितहानी आणि विध्वंसाच्या पार्श्वभूमीवर भारताने 15 टन मदत सामग्री पाठवली. यासोबतच ‘ऑपरेशन ब्रह्मा’ या आपत्कालीन बचाव मोहिमेंतर्गत हवाई आणि सागरी मार्गाने अधिक पुरवठा आणि बचाव पथके रवाना केली आहेत. भारताने म्यानमारमधील आपल्या बचाव कार्याला ‘ऑपरेशन ब्रह्मा’ असे नाव दिले आहे. ‘ऑपरेशन ब्रह्मा’ नक्की काय आहे व हे नाव देण्यामागे काय कारण आहे? जाणून घेऊया.
भारतीय लष्कराच्या मालवाहू विमानाने 15 टन अत्यावश्यक मदत सामग्री यांगून येथे पोहोचवल्यानंतर काही तासातच भारतीय हवाई दलाच्या दोन C-130J विमानांनी पुढील मदत पोहोचवली. भारताचे आणखी एक C-130 विमान म्यानमारची राजधानी नेपीडॉ येथे उतरले. या विमानातून 38 राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (NDRF) जवान आणि 10 टन मदत सामग्री पाठवण्यात आली आहे.
पूर्व नौदल कमांडमधील भारतीय नौदलाची जहाजे, आयएनएस सातपुडा आणि आयएनएस सावित्री, मानवी सहाय्यता आणि आपत्ती निवारण (HADR) कार्यासाठी यांगूनसाठी रवाना झाली आहेत. याव्यतिरिक्त, अंदमान आणि निकोबार कमांडमधील भारतीय नौदलाची जहाजे, आयएनएस करमुक आणि एलसीयू 52 देखील ऑपरेशनमध्ये मदतीसाठी यांगूनसाठी रवाना होणार आहेत. या जहाजांवर सुमारे 52 टन मदत सामग्री पाठवण्यात आली आहे, ज्यात आवश्यक कपडे, पिण्याचे पाणी, अन्न, औषधे आणि आपत्कालीन साठा असलेले HADR पॅलेट यांचा समावेश आहे.
‘ऑपरेशन ब्रह्मा’ नावाचा अर्थ
विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी सांगितले की, भारताने भूकंपग्रस्त म्यानमारच्या लोकांच्या मदतीसाठी सर्वात आधी पाऊल उचलणाऱ्या देशाच्या रूपात काम केले आहे. ब्रह्मा हे सृष्टीचे रचनाकार आहेत. अशा परिस्थितीत जेव्हा आम्ही म्यानमार सरकार आणि तेथील लोकांसाठी या विध्वंसानंतर त्यांच्या देशाच्या पुननिर्माणामध्ये मदतीचा हात पुढे करत आहोत. त्यामुळे या बचाव मोहिमेला दिलेले हे खास नाव विशेष महत्त्वाचे ठरते.
भारत सातत्याने ‘नेबर फर्स्ट’ या धोरणांतर्गत आशियातील देशांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. अनेक देशांच्या मदतीसाठी यापूर्वी भारताने हात पुढे केला आहे. आता ऑपरेशन ब्रह्माच्या माध्यमातून भारत हा संदेश देत आहे की तो आपल्या शेजाऱ्यांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असतो.
भारताची महत्त्वपूर्ण मदत कार्ये:
- ऑपरेशन ब्रह्मा (2025): म्यानमारमधील भूकंपांनंतर मदत आणि बचावासाठी वैद्यकीय मदत पाठवण्यात आली.
- ऑपरेशन मैत्री (2015): नेपाळमधील भूकंपांनंतर बचाव आणि मदत कार्यांसाठी, ज्यात 5,000 हून अधिक लोकांना वाचवण्यात आले.
- ऑपरेशन दोस्त (2023): तुर्की आणि सीरियामधील भूकंपांनंतर 6 टनांहून अधिक मदत सामग्री आणि NDRF टीम पाठवण्यात आल्या.
- ऑपरेशन गुडविल (2005): पाकिस्तानमधील 6 तीव्रतेच्या भूकंपानंतर (काश्मीर प्रदेश) भारताने मदत सामग्री आणि वैद्यकीय मदत पुरवली.
- ऑपरेशन सुनामी रिलीफ (2004): इंडोनेशिया, श्रीलंका आणि मालदीवमधील 1 तीव्रतेच्या भूकंप आणि सुनामीनंतर नौदल जहाजांद्वारे मदत पोहोचवण्यात आली.
- ऑपरेशन हैती (2010): हैतीमधील 0 तीव्रतेच्या भूकंपानंतर भारताने संयुक्त राष्ट्र मिशन अंतर्गत शांतता सेना आणि मदत सामग्री पाठवली.
- ऑपरेशन जपान (2011): जपानमधील 0 तीव्रतेच्या भूकंप आणि सुनामीनंतर भारताने मदत सामग्री आणि सहाय्य पुरवले.





