देव तारी त्याला कोण मारी! म्यानमार भूकंपानंतर 5 दिवसांनी ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर आला तरूण

बँकॉक – म्यानमारमध्ये भूकंपग्रस्तांना मदत आणि बचाव करणाऱ्या पथकाने आज ढिगाऱ्यातून २६ वर्शीय युवकाला जिवंत बाहेर काढले. भूकंप झाल्याच्या ५ दिवसांनंतर या युवकाला जिवंत बाहेर काढण्यात यश आल्याबद्दल आनंद व्यक्त केला जातो आहे.
राजधानी नायपितॉमध्ये एका हॉटेलमध्ये काम करणारा हा युवक पडलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली गेल्या ५ दिवसांपासून अडकून पडला होता. हा युवक जरी जिवंत सापडला असला, तरी बथाव पथकातील सदस्यांना ढिगाऱ्यांखालून अन्य व्यक्तींचे मृतदेहच बाहेर काढावे लागले.
ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेण्यासाठी एन्डोस्कोपिक कॅमेऱ्याची मदत घेण्यात येत आहे.या कॅमेऱ्यात नाईंग तुन या युवकाचा ठावठिकाणा समजू शकला. तसेच हालचाली दिसल्यामुळे हा युवक जिवंत असल्याचेही लक्षात आले होते. जमिनीला भगदाड पाडून या युवकाला बाहेर काढण्यात आले. ढिगाऱ्याखाली तब्बल १०८ तासांपर्यंत या युवकाला जिवंत राहण्यासाठी संघज्ञष करावा लागला होता. अतिवेदना आणि उपासमारीमुळे नाईंग अतिशय कृश झाला होता. मात्र तो शुद्धिवर होता. स्थानिक अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी बाहेर काढताच त्याला सलाईन लावून रुग्णालयाकडे पाठवून देण्यात आले. तुर्कीये आणि स्थानिक बचाव पथकाला यासाठी तब्बल ९ तास प्रयत्न करावे लागले होते.
एक महिन्याची एकतर्फी युद्धबंदी
भूकंपग्रस्तांना मदतीसाठी म्यानमारमध्ये दीर्घ काळापासून यादवी युद्ध सुरू आहे. जवळपास ३० लाख लोकांना विस्थापित व्हावे लागले आहे. तर २ कोटी लोकांना जीवनावश्यक वस्तूंपासूनही वंचित रहावे लागते आहे. या गृहयुद्धामुळे भूकंपग्रस्तांना मदतीपासून वंचित रहावे लागत होते. म्हणून थ्री ब्रदरहूड अलायन्स या सशस्त्र गटाने लष्कराबरोबरच्या संघर्षात एक महिन्याची एकतर्फी युद्धबंदी जाहीर केली आहे.
समांतर विरोधक असलेल्या नॅशनल युनिटी सरकारने आधीच त्यांच्या सैन्याच्यावतीने युद्धबंदी जाहीर केल्याचे म्हटले आहे. मात्र तरी काही विरोधी गटांकडून भूकंपानंतरही आपले हल्ले सुरू ठेवले आहेत. म्यानमारच्या सैन्य दलाने चीनच्या रेड क्रॉसशी संबंधित मदतीच्या वाहनांच्या ताफ्यावर गोळीबार केल्याचा दावा ब्रदरहूड अलायन्सशी संबंधित एका गटाने केला आहे. लोहान मा टी व्हिलेजजवळील शान प्रांताच्या उत्तरेकडील भागातल्या ओना रोडवर हा गोळीबार झाला, असे टांग नॅशनल लिबरेशन आर्मीने म्हटले आहे.





