भयानक! म्यानमार-थायलंड पाठोपाठ आता ‘हा’ देश भूकंपाच्या धक्क्याने हादरला, दिला त्सुनामीचा इशारा

Earthquake hits Tonga | म्यानमार आणि थायलंडमध्ये आलेल्या भूकंपामध्ये प्रचंड मोठी जीवितहानी झाली आहे. या भूकंपामध्ये शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. याशिवाय प्रचंड आर्थिक नुकसान देखील झाले आहे. त्यातच आता प्रशांत महासागरातील बेटांचा देश असणाऱ्या टोंगालाही शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला आहे.
टोंगाजवळ 7.1 तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपानंतर प्रशांत महासागरातील या देशात राष्ट्रासाठी त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे.
अमेरिकेच्या भूगर्भ सर्वेक्षण संस्थेने (USGS) सांगितले की, हा भूकंप टोंगाच्या मुख्य बेटाच्या सुमारे 100 किलोमीटर (60 मैल) ईशान्येला झाला. पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने तात्काळ इशारा जारी करत भूकंपाच्या केंद्रस्थानाच्या 300 किलोमीटर परिसरातील किनारपट्टी भागांना धोकादायक लाटांचा धोका असल्याचे सांगितले आहे.
भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणतीही तातडीची नुकसानीची माहिती मिळालेली नाही.जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेस (GeoForschungsZentrum) ने सांगितले की, हा भूकंप 10 किलोमीटर खोलीवर झाला.
टोंगा हा 171 बेटांचा पॉलिनेशियन देश आहे आणि त्याची लोकसंख्या 1 लाखांपेक्षा जास्त आहे. बहुतेक लोक मुख्य बेट टोंगाटापूवर राहतात. हे बेट ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेकडील किनाऱ्यापासून 3500 किलोमीटरहून अधिक पूर्वेला आहे.
दरम्यान, म्यानमार आणि थायलंडमध्ये आलेल्या भूकंपामुळे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. या भूकंपात म्यानमारमधील 1700 लोकांचा मृत्यू झाला. तर जखमींचा आकडाही 3400 च्या वर पोहोचला आहे.





