West Bengal Exit Poll Results – पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या एक्झिट पोलचे सर्व अंदाज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी फेटाळून लावले आहेत. एक्झिट पोलमध्ये दाखवले जाणारे आकडे हे केवळ तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी भाजपच्या सांगण्यावरून प्रसारित केले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ४ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीपूर्वी समाजमाध्यमावर प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओ संदेशात ममता बॅनर्जी यांनी आपल्या पक्षाला २९४ पैकी २२६ पेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला. Mamata Banerjee ममता बॅनर्जी यांनी या अंदाजांमागे मोठे षडयंत्र असल्याचे सांगताना खळबळजनक दावा केला की, दूरचित्रवाणी वाहिन्यांवर जे आकडे दाखवले जात आहेत, ते दुपारी १.०८ वाजता थेट भाजपच्या कार्यालयातून पाठवण्यात आले होते. हे आकडे प्रसारित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करण्यात आला असून, याबद्दल माझ्याकडे विशिष्ट माहिती उपलब्ध आहे. या एक्झिट पोलवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन त्यांनी जनतेला आणि आपल्या कार्यकर्त्यांना केले. बंगालच्या जनतेने तृणमूल काँग्रेसला कौल दिल्याचा दावा करत ममता पुढे म्हणाल्या की, आम्ही २०२६ च्या या निवडणुकीत सहजपणे दोन तृतीयांश बहुमत पार करू. आमचा आकडा २२६ च्या पुढे जाईल आणि कदाचित तो २३० पर्यंतही पोहोचू शकतो. राज्यातील जनतेने दिलेल्या मोठ्या जनादेशावर माझा पूर्ण विश्वास आहे. यावेळी ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही थेट हल्ला चढवला. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान केंद्रीय सुरक्षा दलांनी भाजपचे एजंट म्हणून काम केल्याचा आरोप त्यांनी केला. अमित शहा यांच्या थेट सूचनेनुसारच सुरक्षा दलांनी बंगालमध्ये पक्षपाती भूमिका घेतल्याचे त्यांनी आपल्या संदेशात नमूद केले आहे.