Mamata Banerjee : ममतांच्या नेतृत्वाला थेट आव्हान.! तृणमूलवर ताबा मिळवण्याचे बंडखोरांचे प्रयत्न
तृणमूल कॉंग्रेसच्या बंडखोर गटाने आता पक्षप्रमुख ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाला थेट आव्हान दिले आहे. त्या गटाने आपला उल्लेख खरा तृणमूल कॉंग्रेस म्हणून केला.

Mamata Banerjee – तृणमूल कॉंग्रेसच्या बंडखोर गटाने आता पक्षप्रमुख ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाला थेट आव्हान दिले आहे. त्या गटाने आपला उल्लेख खरा तृणमूल कॉंग्रेस म्हणून केला.
तसेच, पुढचे पाऊल उचलत पक्षाध्यक्षपदी ज्येष्ठ आमदार अरूप रॉय यांची नियुक्ती केली. त्यामुळे तृणमूलवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न बंडखोरांनी सुरू केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यातून पक्षाच्या नियंत्रणासाठी ममता विरूद्ध बंडखोर गट असा संघर्ष तीव्र बनण्याची चिन्हे आहेत.
पश्चिम बंगालची सत्ता गमावलेल्या तृणमूलमध्ये याआधीच मोठी फूट पडली. प्रथम आमदारांच्या आणि नंतर खासदारांच्या गटांनी बंडखोरी केली. मात्र, ती फूट तृणमूलच्या विधिमंडळ आणि संसदीय पक्ष पातळीपर्यंतच मर्यादित होती.
आता आणखी पुढे जात बंडखोरांनी मूळ तृणमूल पक्षावरच नियंत्रण मिळवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गटाने सोमवारी तृणमूलचे विशेष अधिवेशन बोलावले.
त्यामध्ये तृणमूलच्या ३० सदस्यीय नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची नियुक्ती करण्यात आली. तसेच, आवाजी मतदानाने ७० वर्षीय रॉय यांची पक्षाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
तृणमूल पक्षाच्या घटनेबाबत निर्माण झालेला पेच संपुष्टात आणण्यासाठी अधिवेशन बोलावण्यात आल्याची भूमिका बंडखोर गटाने मांडली. दर तीन वर्षांनी तृणमूलच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची स्थापना पक्षाच्या घटनेनुसार अनिवार्य आहे.
याआधीच्या कार्यकारिणीची स्थापना फेब्रुवारी २०२२ मध्ये झाली. त्यामुळे मुदत संपली असल्याने पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची फेररचना गरजेची बनली, असा दावा त्या गटाने केला.
बंगालमध्ये तृणमूलचे एकूण ८० आमदार, तर लोकसभेचे २८ खासदार आहेत. त्यातील ५८ आमदार आणि २० खासदारांनी ममतांची साथ सोडली. आता बंडखोर गटाने मूळ पक्षावरच हक्क सांगत ममतांचा तृणमूलवरील ताबा काढून घेण्याचे मनसुबे उघड केले आहेत.





