शिवरायांच्या पालखी सोहळ्याचे आळंदीत स्वागत

आळंदी -भागवत परंपरेच्या दृष्टीने आत्यंतिक महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होऊन हिंदवी स्वराज्य राजधानी रायगडास परतीची वारी पोहचविलेल्या छत्रपती श्रीशिवाजी महाराजांच्या पादुका वढूतून निघून पुढील अकरा
महिन्यांच्या वास्तव्यासाठी शिवजन्मभूमी शिवनेरीस जाताना आळंदीत पोहोचल्या. श्रीशिवछत्रपतींची व माऊलींची भेट झाल्यानंतर संस्थानकडून माऊलींचे मानाचे वस्त्र, उपरणे देऊन श्रीशिवछत्रपतींच्या पादुकांचे पूजन करण्यात आले.
चंद्रभागास्नान, नगर प्रदक्षिणेसह आषाढी एकादशीलाच श्रीशिवछत्रपतींच्या पादुका पंढरीच्या राजाच्या दर्शनास गेल्या होत्या. गुरुपौर्णिमेपर्यंत पंढरपुरात राहूनच शिवछत्रपती पंढरीत आलेल्या सर्वच पालख्यांच्या दर्शनास गेल्याने संतभेटीचा नवा पायंडा पडला.
तसेच सर्वच संतांच्या पालख्यांनी भूवैकुंठ पंढरपूर निर्विघ्नपणे सोडल्यानंतरच पिछाडी निर्धोक करुन मगच पंढरी सोडण्याची नवी परंपरा श्रीशिवछत्रपतींच्या पालखीने यंदापासून रुढ केली.
आषाढी वारीच्या निमित्ताने भक्तिसागरात सामील होण्यासाठी निघालेल्या या शक्तिपरंपरेतील शिवरायांच्या पादुका दरवर्षी शिवनेरी,
संग्रामदुर्ग, मल्हारगड, पुरंदर, रायरेश्वर असा प्रवास करून रायगडला जातात. राज्याभिषेकापासून पुढील 5 दिवस रायगडावरच विसावा घेऊन ज्येष्ठ वद्य चतुर्थीला श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवतात.
करोना काळातही सर्व नियम-निर्बंध पाळून सोहळ्यास यशस्वी करण्यासाठी स्थानिक पातळीवर नारायणराव मुंगसे, प्रदीप शिवले यांनी परिश्रम घेतले. पंढरपुराहून परतलेल्या शिवछत्रपतींच्या आपल्या जन्मभूमीतील प्रस्थानास आळंदीतील नगरसेवक सचिन गिलबिले,
माजी नगरसेवक आनंदराव मुंगसे, दिनेश घुले, शिवसेना शहरप्रमुख अविनाश तापकीर, मनसे शहर अध्यक्ष अजय तापकीर, उद्योजक सुरेश झोंबाडे, प्रल्हाद सोमवंशी, हभप अशोक पवार, अनिकेत पाटील, सूरज ढोले उपस्थित होते.





