Cosmos Bank : कॉसमॉस बँकेला ‘एनपीए व्यवस्थापन’ उत्कृष्टतेचा राष्ट्रीय पुरस्कार
Cosmos Bank : इंडियन को-ऑपरेटिव्ह समिट अँड एक्सलन्स अवॉर्ड्स २०२६ मध्ये कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेला एनपीए व्यवस्थापनातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार.

Cosmos Bank : भारतीय सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुण्यातील कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या ‘इंडियन को-ऑपरेटिव्ह समिट अँड एक्सलन्स अवॉर्ड्स २०२६’ या सोहळ्यात बँकेला ‘एक्सलन्स इन एनपीए मॅनेजमेंट’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गुरुवारी (दि. १९ नोव्हेंबर) नवी दिल्लीतील हॉटेल अशोक येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. बँकेचे अध्यक्ष सचिन आपटे आणि संचालक प्रवीणकुमार गांधी यांनी बँकेच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.
या सोहळ्याला रिझर्व्ह बँकेच्या सेंट्रल बोर्डाचे माजी संचालक सतीश मराठे, नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स अँड क्रेडिट सोसायटीजचे (नॅफकब) अध्यक्ष लक्ष्मी दास, ‘इंडियन को-ऑपरेटिव्ह’चे संपादक अजय झा आणि ज्योतींद्र मेहता यांच्यासह सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
देशातील विविध राज्यांमधील सुमारे ४०० प्रतिनिधी या सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी देशभरातील सहकारी संस्था आणि सहकार क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. कॉसमॉस बँकेला मिळालेला हा पुरस्कार बँकेच्या थकीत कर्ज व्यवस्थापनातील कामगिरीची दखल घेणारा आहे.





