आयएनएस शिवाजी येथे ‘स्वर्णिम विजय मशाल’चे स्वागत

पुणे : भारतीय सैन्य दलाच्या 1971 च्या युद्धातील विजयाचे प्रतीक असलेली स्वर्णिम विजय मशाल ही पुण्यातील विविध संस्थांना भेट देत असून, त्याठिकाणी मशालीचे भव्य स्वागत केले जात आहे. नुकतेच लोणावळा येथील नौदल प्रशिक्षण संस्था असलेल्या आयएनएस शिवाजी याठिकाणी या विजय मशालीचे स्वागत करण्यात आले.
भरतीय सैन्य दलाने पाकिस्तानवर 1971 सालच्या युद्धात मिळविलेल्या विजयास यंदा 50 वर्षे पूर्ण झाली आहे. हे वर्ष संपूर्ण भारतात स्वर्णिम विजय वर्ष म्हणून साजरे केले जात असून, त्यानिमित्ताने दिल्ली येथून देशाच्या चारही दिशांमध्ये विजय मशाल रवाना करण्यात आल्या आहेत.
या मशाली येत्या 16 डिसेंबरमध्ये आपला प्रवास पूर्ण करून, पुन्हा दिल्लीमध्ये जाणार आहेत. नुकतेच आयएनएस शिवाजी येथे स्वर्णिम विजय मशालीचे स्वागत करण्यात आले.
यावेळी संस्थेचे प्रमुखांनी विजय मशालीचे स्वागत केले. तसेच 1971 च्या युद्धातील दिग्गजांचा सत्कार केला. याप्रसंगी शहीद जवानांना श्रद्धांजलि अर्पण करण्यात आली. यानिमित्ताने नौदल बास्केटबॉल संघ आणि दक्षिण रेल्वे बास्केटबॉल संघ यांच्यात बास्केटबॉल सामना आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सांगता शालेय मुलांसाठी सभागृहात एक युद्ध चित्रपट दाखवून करण्यात आली.





