Weather Alert : राज्यात काही भागात गेल्या दोन दिवसांत पावसाने हजेरी लावली असून बहुतांश भागात ढगाळ वातावरण आहे. या वातावरणामुळे सकाळी आणि सायंकाळी जाणवणारी थंडी नाहीशी झाली असली तरी पुन्हा थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पुढील काही दिवसांपासून गुलाबी थंडी पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात शुक्रवारप्रमाणे आज, शनिवारीही ढगाळ वातावरण होते. मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांत ढगाळ वातावरणाचा परिणाम अधिक जाणवत आहे. राज्यात सध्या दुपारचे कमाल तापमान ३३ अंश सेल्सियस तर पहाटेचे किमान तापमान २१ अंश सेल्सियसच्या दरम्यान असून ही दोन्हीही तापमाने सरासरीपेक्षा जवळपास दोन अंश सेल्सियसने अधिक आहेत. मुंबईसह कोकणातील ढगाळ वातावरणही निवळेल आणि रविवारपासून संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा थंडीसाठीची स्थिती पूर्ववत होईल, असा अंदाज आहे. पुढील दहा दिवस म्हणजे, सोमवार २५ नोव्हेंबरपर्यंत चक्रीवादळाची कोणतीही वातावरणीय निर्मिती दोन्हीही समुद्रात सध्या तरी जाणवत नाही. त्यामुळे दरम्यानच्या काळात महाराष्ट्रातही थंडीसाठी अटकाव करणारा कोणताही वातावरणीय बदलाची शक्यता कमी असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.