Weather Alert: राज्यात पावसाचा जोर कायम; नाशिकला झोडपले यवतमाळमध्ये ही मुसळधार

Weather Alert – राज्यात काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे पुनरागमन झाले असून नाशिकसह मराठावाडा आणि विदर्भातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. नाशिकमध्ये केवळ अर्ध्या तासाच्या पावसाने शहराला झोडपून काढले.
यामुळे शहरातील रस्त्यांना नद्यांचे रूप आल्याचे दिसून आले. तसेच उड्डाणपूल आणि पुलाखाली जाणाऱ्या रस्त्यावर देखील पाणी साचले होते. नाशिकमध्ये दुपारच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली, केवळ अर्ध्या तास कोसळलेल्या मुसळधारांनी जनजीवन विस्कळीत झाले.
तसेच, वाशिम जिल्ह्यात आज अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार अनेक गर्जना आणि विजेच्या कडकडाटात पावसाची धुव्वाधार बॅटिंग पाहायला मिळाली. या पावसामुळे धरणक्षेत्र परिसरातील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होणार आहे.
अकोला जिल्ह्यातही गेल्या आठ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने सोमवारी दुपारी हजेरी लावली. ढगांचा गडगडाट आणि विजांचा चमचमाट सुरू असतानाच मुसळधार पावसाने झोडपून काढले.
सिंधुदुर्गातही पावसाचा जोर कायम असून कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, वैभववाडी भागात पावसाचा जोर कायम आहे. जिल्हात आज यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. गेले आठ ते दहा दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने कमबॅक केल्याने शेतकरी समाधानी झाले आहेत.
दरम्यान, यवतमाळच्या दारव्हा यवतमाळ महामार्गावर बोरीअरब येथील अडान नदीवरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने दुचाकी वाहून गेल्याची घटना आज घडली.
नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातील तेलंगणा सीमेवरील अप्पाराव पेठ येथील नाल्याला पावसाच्या पाण्यामुळे अचानक पूर आल्याने एक वयोवृद्ध व्यक्ती पाण्याच्या पुरात अडकला होता. या वयोवृद्ध इसमास आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या प्रयत्नाने वाचविण्यास यश आले.





