पुण्यात सराईत गुन्हेगारांकडून दहा लाखांची शस्त्रे जप्त

पुणे, दि. 1 -सराईत गुन्हेगारांकडून सुमारे दहा लाख रुपयांचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. पोलिसांनी केलेल्या तीन वेगवेगळ्या कारवाईत चौघांना अटक करण्यात आली आहे. ही शस्त्रे कोणाला विकली जाणार होती तसेच यामागचा उद्देश काय होता, या अनुषंगाने पोलीस तपास करीत आहेत.
विमानतळ पोलिसांनी केलेल्या कारवाईत राहुल गोपाळ गवळी (वय 35, रा. जळगाव) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून गावठी बनावटीचे पाच पिस्तुल आणि 14 जिवंत काडतुसे असा दोन लाख 26 हजार 400 रुपयांचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मंगेश जगताप, उपनिरीक्षक रवींद्र ढावरे, कर्मचारी सचिन जाधव आणि प्रदीप मोटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकाने दोघांना अटक करून गावठी बनावटीचे तीन पिस्तुल, नऊ जिवंत काडतुसे आणि कार असा सहा लाख 24 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. अजय ऊर्फ महाराज कमलाकर भोरे (वय 28, रा. मुंढवा) आणि ओंकार प्रदीप कांबळे (वय 22, रा. काकरंबा, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर, सहायक निरीक्षक विवेक पाडवी, अंमलदार उदय काळभोर, राजेश अभंगे, सुदेश सपकाळ, गणेश लोखंडे, विनायक येवले, राहुल इंगळे, विक्रांत सासवडकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
गुंजन टॉकिजजवळ शस्त्र विक्रीसाठी थांबलेल्या सराईताला गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने अटक केली. राहुल रोहिदास जाधव (वय 31, रा. येरवडा) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून तीन पिस्तुल आणि तीन काडतुसे असा 91 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने, उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, अंमलदार मच्छिंद्र वाळके यांच्या पथकाने ही कारवाई केली





