Pradeep Purnekar : आम्ही शेवटपर्यंत तुमच्यासोबत राहू..! उद्धव ठाकरेंकडून पूर्णेकर कुटुंबाचे सांत्वन
पूर्णेकर हत्या प्रकरणात अटक केलेला पप्या शिंदे हाच मुख्य आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. पप्या शिंदेला न्यायालयाने ५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Pradeep Purnekar – ठाण्याच्या मानपाडा परिसरातील ठाकरेसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची मंगळवारी रात्री हत्या करण्यात आली होती. बुधवारी ठाकरेसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पूर्णेकरांच्या घरी जात त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. सध्याच्या घडीला जे कराल ते शांत डोक्याने करा. भावनिक होऊन कुठलेही पाऊल उचलू नका, असा सल्ला यावेळी ठाकरेंनी पूर्णेकरांचा मुलगा आणि भावाला दिला.
मानपाडा परिसरात पूर्णेकरांना मानणारा मोठा वर्ग आहे. ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असतानाही मानपाडा, मनोरमा नगर, आझाद नगर या परिसरात पूर्णेकरांच्या रुपाने ठाकरे गटाचा दबदबा होता. त्यामुळे प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येने ठाकरे गटात खळबळ माजली होती.
ठाकरे यांनी पूर्णेकर कुटुंबाला आधार देताना आम्ही शेवटपर्यंत तुमच्यासोबत राहू, असे आश्वासन दिले. उद्धव ठाकरेंशी बोलताना प्रदीप पूर्णेकर यांची पत्नी विजेता पूर्णेकर, मुलगा राम पूर्णेकर आणि मुलगी हे सर्वजण भावूक झाले. उद्धव ठाकरेंनी आपल्या घरी एकदा तरी यावे, ही प्रदीप पूर्णेकरांची इच्छा होती.
तुम्ही घरी आलात हे बघून आज त्यांना आनंद झाला असता, असे पूर्णेकर कुटुंबाने म्हटले. न्यायालयाच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा तपास व्हावा. या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही पूर्णेकर कुटुंबियांनी ठाकरेंकडे केली.
पप्या शिंदे मुख्य आरोपी
पूर्णेकर हत्या प्रकरणात अटक केलेला पप्या शिंदे हाच मुख्य आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. पप्या शिंदेला न्यायालयाने ५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
दरम्यान, मिरा रोड येथून एक महिला आणि एका पुरुषाला पोलिसांनी ताब्यात घेतले. हे दोघे फरार आरोपींच्या संपर्कात असल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे.
चार आरोपी सद्या फरार असून, पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. पप्या शिंदे हा पूर्णेकरांच्या हत्येनंतरही त्यांच्या संपर्कात होता, अशी माहिती आहे.
या महिला आणि पुरुषाकडून फरार आरोपींबाबत माहिती मिळण्याची शक्यता आहे. पप्या शिंदेचे इतर साथीदार कुठे आहेत, याचा तपास आता ठाणे पोलीस करत आहेत.





