Phursungi News : शब्दाला हरताळ फासत ५०० टन अतिरिक्त कचरा सुरू; संतप्त ग्रामस्थांनी रोखला भूमी ग्रीन प्रकल्प
“आधी चर्चा, मग निर्णय” असा शब्द देऊनही ग्रामस्थांना विश्वासात न घेता तब्बल ५०० मेट्रिक टन अतिरिक्त कचरा भूमी ग्रीन प्रकल्पात टाकण्यास सुरुवात केल्याने फुरसुंगी–उरुळी देवाचीकरांचा (Phursungi News) संताप अनावर झाला आहे.

Phursungi News : “आधी चर्चा, मग निर्णय” असा शब्द देऊनही ग्रामस्थांना विश्वासात न घेता तब्बल ५०० मेट्रिक टन अतिरिक्त कचरा भूमी ग्रीन प्रकल्पात टाकण्यास सुरुवात केल्याने फुरसुंगी–उरुळी देवाचीकरांचा (Phursungi News) संताप अनावर झाला आहे. बैठक झाली नाही, निर्णय झाला नाही; तरीही कचरा मात्र सुरू! असा सवाल उपस्थित करत संतप्त ग्रामस्थ आणि नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी भूमी ग्रीन कचरा प्रक्रिया प्रकल्पाला चक्क टाळे ठोकले.
पुणे महापालिकेच्या कचरा डेपोतील भूमी ग्रीन प्रकल्पात यापूर्वी ३२५ मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात होती. त्यात आता नव्याने ५०० मेट्रिक टनांची भर पडल्याने दररोज तब्बल ८२५ मेट्रिक टन कचरा परिसरात येऊ लागला आहे. त्यामुळे आधीच कचरा डेपोच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या ग्रामस्थांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
विशेष म्हणजे, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या मागील बैठकीत ग्रामस्थ, पालिका प्रशासन आणि संबंधित पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली होती. नव्या ५०० टन प्रकल्पाबाबत अंतिम चर्चा होईपर्यंत सर्व कामे स्थगित (Phursungi News) ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर १८ सप्टेंबरला ग्रामस्थ आणि पालिका प्रशासनाची संयुक्त बैठक घेऊन या प्रश्नावर मार्ग काढण्याचे निश्चित झाले होते.
मात्र, १८ सप्टेंबरची बैठकच झाली नाही! बैठक नाही, चर्चा नाही, तोडगा नाही; उलट पालिका प्रशासनाने ग्रामस्थांना विश्वासात न घेता ५०० मेट्रिक टन कचरा सुरू केल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
‘पहिले शब्द, नंतर कचरा?’
“बैठक होईपर्यंत कामे थांबविण्याचा निर्णय झाला असताना बैठक न घेता प्रकल्प सुरू करण्याचा अधिकार प्रशासनाला कोणी दिला?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. पालिकेच्या या भूमिकेच्या निषेधार्थ ग्रामस्थ आणि नगर परिषदेचे पदाधिकारी आक्रमक झाले. त्यांनी भूमी ग्रीन प्रकल्पाला टाळे ठोकून ५०० टन कचरा प्रक्रिया रोखली.
आता या टाळ्यामुळे (Phursungi News) केवळ एका प्रकल्पाचे काम थांबले नसून फुरसुंगी–उरुळी देवाचीचा कचरा प्रश्न पुन्हा पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. प्रशासनाने तातडीने ग्रामस्थांशी चर्चा करून तोडगा काढला नाही, तर येणाऱ्या काळात कचराकोंडीचा प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यताआहे. यावेळी विशाल नाना हरपळे , उपनगर अध्यक्ष ओंकार कामठे, नगरसेवक गणेश ढोरे ,महेश हरपळे ,संतोष पवार, पिंटू हरपळे, संदीप काका हरपळे ,चंद्रकांत ढमाळ ,विकास भाडळे, प्रशांत भाडळे, रणजीत रासकर ,उत्तम कामठे ,राहुल हरपळे, दत्ता राऊत ,दिलीप भापकर ,राम हरपळे, सचिन शितोळे ,मुन्ना मुलानी ,भूपेंद्र बेंगळे ,अक्षय हरपळे, महेश कामठे ,अनिकेत काळे ,संजीत सिंग परदेशी, सोमनाथ यादव व ग्रामस्थ उपस्थित होते. याबाबत पुणे महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
फुरसुंगी- उरुळी देवाची नगरपरिषद पदाधिकारी ग्रामस्थांनी कचरा डेपोवरुन भुमीग्रीन प्रकल्पाला टाळे ठोकुन पाठ फिरवताच पालिका प्रशासनाकडुन काही तासांत पुन्हा प्रकल्प सुरु करण्यात आला.त्यामुळे दोन्ही गावच्या ग्रामस्थांच्या समस्येबाबत पालिका प्रशासनाला किती आस्था आहे हे दिसून येते.






