“आम्ही दिवाळी साजरी करणार नाही”! बारामतीतील प्रसिद्ध दिवाळी पाडवा भेट यंदा रद्द ; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट

प्रभात वृत्तसेवा
बारामती – प्रत्येक दिवाळीला पवार कुटुंबीय बारामतीत वास्तव्यास असतात. राज्यभरातून येणाऱ्या कार्यकर्ते व चाहत्यांसाठी ही पर्वणीच असते. पक्षाचे अनेक पदाधिकारी, आमदार, खासदार बारामतीत येत असतात. मात्र, यंदा ही दिवाळी पाडवा भेट होणार नसल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.बारामतीत दरवर्षी दिवाळीत पवार कुटुंबीयांना भेटण्यासाठी, दिवाळी शुभेच्छा देण्यास राज्यातून कार्यकर्ते येतात. यंदा पवार कुटुंबीय दिवाळी साजरी करणार नाहीत. आमच्या काकी भारती प्रतापराव पवार यांचे नुकतेच निधन झाले. त्या आम्हा सर्वांसाठी आईसमान होत्या. म्हणूनच आम्ही सर्व पवार कुटुंबीयांनी मिळून यावर्षीची दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे दरवर्षी गोविंदबाग, बारामती येथे होणारी दिवाळी आणि दिवाळीच्या पाडव्यानिमित्त होणारा सहृदांच्या भेटीचा कार्यक्रम देखील यावर्षी होणार नाही. तरी आपण सर्वांनी याची नोंद घ्यावी. आपणा सर्वांना ही दिवाळी आनंदाची, सुखसमृद्धीची आणि भरभराटीची जावो, ही सदिच्छा, असे खासदार सुळे यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये नमूद केले आहे.दरम्यान, उपमुख्यमंत्री पवार यांनी देखील पवार कुटुंबात दु:खद घटना घडली आहे. याशिवाय मराठवाड्यातील पूरग्रस्त परिसरात वाइट परिस्थिती आहे. त्यामुळे यंदा पवार कुटुंबीयांचा दिवाळी पाडवा होणार नसल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.





