‘आम्ही गरीब असू शकतो पण बेईमान नाही’; फ्लोअर टेस्टपूर्वी जीतन राम मांझी यांचे विधान

Bihar Political: फ्लोर टेस्टपूर्वी बिहारच्या राजकीय वर्तुळात जोरदार राजकीय घडामोडी सुरू आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्थानी अवाम मोर्चावर सर्व पक्षांच्या नजरा खिळल्या आहेत. उद्या 12 फेब्रुवारीला बिहारमध्ये फ्लोर टेस्ट होणार आहे. यामध्ये नितीश कुमार यांना बिहार विधानसभेत बहुमत सिद्ध करायचे आहे. त्यापूर्वी जीतन राम मांझी यांनी केलेले विधान चर्चेत आले आहे.
माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे नेते जीतन राम मांझी म्हणाले, “आम्ही व्हीप जारी केला आहे की आमचे चार आमदार एनडीए आघाडीला मतदान करतील. हे अगदी स्पष्ट आहे. आम्ही गरीब असू शकतो पण बेईमान नाही. मी जिथे आहे तिथेच राहीन. देशाचे पंतप्रधान खूप चांगले काम करत आहेत. आमचा पक्ष आणि समाज पूर्णपणे पंतप्रधानांकडे झुकलेला आहे.”
यासोबतच जीतनराम मांझी यांनी शनिवारी सीपीआय (एमएल)चे आमदार मेहबूब आलम यांच्याशी झालेल्या भेटीबाबत स्पष्ट शब्दांत सांगितले की, 43-44 वर्षांच्या राजकारणात अनेक लोक माझ्याकडे येतात आणि मला भेटतात, त्यामुळे मी त्यांना नकार देऊ शकत नाही. कोणी फक्त भेटून कंफ्यूजन घातला, याचा अर्थ तो जितनराम मांझी यांना ओळखू शकला नाही.
दुसरीकडे, मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा पक्ष जनता दल युनायटेडनेही व्हीप जारी केला आहे. पक्षाने सर्व आमदारांना फ्लोर टेस्ट दरम्यान विधानसभेत उपस्थिती नोंदवण्यास सांगितले आहे. बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार स्थापन झाले आहे, परंतु यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासमोर सर्वात मोठे फ्लोर टेस्टचे आव्हान आहे.




