आम्ही अस्सल धर्म पाळणारे, हिंदीची सक्ती उखडून फेकू; उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा

मुंबई : महाराष्ट्रात सर्वभाषिक गुण्यागोविंदाने राहत आहेत. त्यांच्यामध्ये काड्या घालण्याचे धंदे करू नका. आम्ही अस्सल धर्म पाळणारे, मराठी बोलणारे हिंदू आहोत. पण हिंदीची सक्ती कोणी करत असेल तर ती आम्ही उखडून फेकू, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. भारतीय कामगार सेनेच्या ५७व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शनिवारी बोलताना उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीला कडाडून विरोध केला आहे.
मुंबईत राहणाऱ्या अमराठींसाठी शिवसेनेने ‘चला मराठी शिकूया’ क्लास सुरू केला आहे. त्याला उत्तर भारतीयांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण ते पाहिल्यानंतर सरकारच्या पोटात गोळा आला आणि हिंदीची सक्ती केली, अशी टीका देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.
महाराष्ट्रात राहील त्याला मराठी आलीच पाहिजे
पुढे बोलताना म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात मराठी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय घेतला होता. जो महाराष्ट्रात राहील त्याला मराठी आलीच पाहिजे, ही सक्ती केली होती. महाराष्ट्रातील सर्व दुकानांच्या पाट्या मराठीत लिहिण्याचा कायदा केला, पण आताच्या सरकारने त्याची किती अंमलबजावणी केली, अशी विचारणा देखील उद्धव ठाकरे यांनी केली.
हिंदी व आमचे वैर नाही
पुढे म्हणाले, हिंदी व आमचे वैर नाही, सर्वजण हिंदी, मराठी बोलतात. असे असताना हिंदीची सक्ती कशासाठी केली जात आहे?, असा सवाल करत तामिळनाडूमध्ये हिंदीमधला ही तरी बोलून दाखवा, असे आव्हानही ठाकरेंनी भाजपला दिले. महाविकास आघाडीचे सरकार गद्दारी करून पाडल्यानंतर ‘एसंशिं’ आता भाजपच्या पालख्या वाहत आहेत. मराठीवर अन्याय करणाऱ्यांचे पाय चाटत आहेत आणि हे कसले बाळासाहेबांचे विचार पुढे नेणार, असा संताप उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.





