West Bengal election : या संघर्षात आम्ही त्यांच्या साथीला आहोत.! अरविंद केजरीवाल यांचा ममतांना पाठिंबा
आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी राजकीय रणसंग्रामाला सामोऱ्या जात असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दर्शवला.

West Bengal election – आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी राजकीय रणसंग्रामाला सामोऱ्या जात असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दर्शवला. लोकशाही वाचवण्यासाठी ममता लढा देत आहेत. त्या संघर्षात आम्ही त्यांच्या साथीला आहोत, असे केजरीवाल यांनी म्हटले.
बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्या रणसंग्रामात ममतांच्या नेतृत्वाखालील तृणमूल कॉंग्रेस विरूद्ध भाजप असा जोरदार मुकाबला रंगण्याची चिन्हे आहेत.
निवडणूक जाहीर केल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने बंगालमधील वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश दिला. त्याविषयी ममतांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर, ममतांच्या पाठिशी उभे राहत केजरीवाल सोशल मीडियावरून व्यक्त झाले.
भाजपने अप्रामाणिकपणे विजय मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाला हत्यार बनवले आहे. जे आज बंगालमध्ये घडतेयं, तेच दिल्ली विधानसभा निवडणुकीतही घडले होते. मतदारयाद्यांमधून अनेकांची नावे वगळण्यात आली. पोलिसांनी भाजपच्या अयोग्य कृतींना पूर्ण मोकळीक दिली.
संपूर्ण प्रशासन भाजपच्या विजयासाठी सक्रिय झाले. लोकशाहीच्या चिंधड्या उडवण्यात आल्या, अशा आरोपांची सरबत्ती त्यांनी केली.
ममता आणि केजरीवाल यांच्यात चांगला राजकीय सलोखा आहे.
त्यातून केजरीवाल यांनी ममतांच्या पारड्यात वजन टाकल्याचे मानले जाते. बंगालमधील यावेळच्या निवडणुकीला अतिशय चुरशीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्या निवडणुकीसाठी २३ आणि २९ एप्रिल अशा दोन टप्प्यांत मतदान होईल.






