कोलकता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुकताच सीमा सुरक्षा दलाला (बीएसएफ) लक्ष्य करणारा आरोप केला. तो सुरक्षा दलांचा अवमान करणारा असल्याचे टीकास्त्र बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी सोडले. ममतांनी सनसनाटी आरोप, दावे करताना एकाच वेळी केंद्र सरकार आणि बीएसएफवर निशाणा साधला. बीएसएफ बांगलादेशी घुसखोरांना भारतात शिरकाव करण्याची मोकळीक देत आहे. त्यामागे बंगालला अस्थिर बनवण्याचा डाव आहे. संबंधित घडामोडी केंद्र सरकारच्या योजनेचा भाग आहेत, असे त्या म्हणाल्या. त्यावरून भाजपचे नेते अधिकारी यांनी ममतांना पत्र पाठवून नापसंती व्यक्त केली. राजकारणात आरोप-प्रत्यारोप होत असतात. मात्र, त्यामध्ये सुरक्षा दलांना ओढणे हे अतिशय हीन दर्जाचे राजकारण आहे. राज्य सरकारच्या अपयशाचे खापर सुरक्षा दलांवर फोडले जात आहे. ममतांचे आरोप मतपेढीच्या राजकारणाचे भाग आहेत. सीमेशी संबंधित बाबींवर बंगाल सरकारकडून बीएसएफशी असहकार्य केले जाते, असे अधिकारी यांनी पत्रात म्हटले. ममतांचे आरोप बीएसएफने याआधीच फेटाळून लावले.