Water Supply: वडगावचा पाणीपुरवठा ५ दिवसांपासून ठप्प; संतप्त नागरिकांचा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा
Water Supply: पाणीपुरवठा महावितरणच्या वीज खंडितीमुळे पूर्णपणे विस्कळीत; संस्कृती जलशुद्धीकरण केंद्राचा तात्पुरता पुरवठा शहराच्या गरजेपुढे अपुरा ठरल्याने नागरिकांचे हाल.

Water Supply – वडगाव शहराला जांभूळ धरणावरून होणारा पाणीपुरवठा गेल्या सलग पाच दिवसांपासून विस्कळीत झाला. त्यामुळे हजारो नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जांभूळ धरण परिसरात महावितरणकडून वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडितीमुळे पाणी उपसा केंद्र आणि वितरण व्यवस्था ठप्प झाली आहे. परिणामी शहरातील अनेक भागांमध्ये नियमित पाणीपुरवठा बंद पडला असून नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
नगरपंचायतीकडून काही भागांना संस्कृती जलशुद्धीकरण केंद्रावरील टाकीतून तात्पुरता पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र हा पुरवठा शहराच्या गरजेच्या तुलनेत अपुरा ठरत असल्याने अनेक भागांतील नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक कुटुंबांना पिण्याचे पाणी साठवून ठेवावे लागत असून दैनंदिन घरगुती कामांवर त्याचा परिणाम होत आहे. गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पूरस्थिती आता आटोक्यात आली असून पावसाचाही जोर कमी झाला आहे.
असे असतानाही जांभूळ धरणावरील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी अपेक्षित गतीने उपाययोजना होत नसल्याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. पाणीपुरवठा पूर्ववत होण्याबाबत स्पष्ट माहिती मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. स्थानिकांच्या मते, जांभूळ धरणावरील पाणी उपसा केंद्राला अखंडित वीजपुरवठा मिळत नसल्यामुळे ही समस्या वारंवार उद्भवत आहे. प्रत्येक पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित झाला की शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होतो.
त्यामुळे महावितरण आणि नगरपंचायतीने या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. महावितरण, वडगाव नगरपंचायत आणि सत्ताधारी पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळेच ही परिस्थिती ओढवल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. नागरिकांना वेळेत माहिती न देणे, पर्यायी नियोजन न करणे आणि समस्या सोडविण्यास विलंब होत असल्याने लोकांमध्ये असंतोष वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने दखल घेत वडगावकरांना दिलासा द्यावा. अन्यथा नागरिकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.





