Water Scarcity: पाणी जपून वापरा! भामा आसखेड धरणात अवघा २९% साठा; यापुढे आवर्तन नाही
Water Scarcity: मागणी असूनही सिंचनासाठी पाणी मिळणे अशक्य; धरणाचे बॅकवॉटर १४ किलोमीटर मागे कोळीवे गावापर्यंत सरकले, गेल्या वर्षीपेक्षाही साठा कमी.

Water Scarcity – तीव्र उन्हाळा आणि पावसाने दिलेल्या ओढीमुळे भामा आसखेड धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून सध्या धरणात केवळ 2.23 टीएमसी (29.15 टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. पुणे शहर, चाकण, आळंदी तसेच औद्योगिक वसाहतींचा पाणीपुरवठा या धरणावर अवलंबून असल्याने उपलब्ध पाणी केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे कोणतेही आवर्तन सोडले जाणार नसल्याची माहिती भामा आसखेड प्रकल्पाचे सहायक अभियंता अश्विन पवार यांनी दिली.
पुणे महानगरपालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पुणे शहर, आळंदी, चाकण शहर, चाकण औद्योगिक वसाहत तसेच परिसरातील अनेक गावांना भामा आसखेड धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सततचा उपसा आणि अपुरा पाऊस यामुळे धरणातील पाण्याची पातळी लक्षणीयरीत्या घटली आहे. सध्याचा उपलब्ध पाणीसाठा केवळ पिण्याच्या पाण्यासाठी नियोजित करण्यात आला आहे. त्यामुळे नदीपात्रात पाणी सोडले जाणार नाही तसेच कोणतेही आवर्तन दिले जाणार नाही, असे अश्विन पवार यांनी स्पष्ट केले.
नदीकाठच्या गावांतील नागरिक आणि शेतकर्यांकडून सिंचनासाठी पाण्याची मागणी होत असली तरी उपलब्ध साठा लक्षात घेता ती पूर्ण करणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. अधिकार्यांच्या मते, जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यास सप्टेंबरपर्यंत धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. मात्र, यासाठी आगामी काळातील पावसावरच सर्व काही अवलंबून राहणार आहे.
धरणाची पातळी चिंताजनक
भामा आसखेड धरणाची एकूण साठवण क्षमता 8.14 टीएमसी असून सध्या केवळ 2.23 टीएमसी पाणी शिल्लक आहे. पाण्याची पातळी इतकी खालावली आहे की धरणाचे बॅकवॉटर तब्बल 14 किलोमीटर मागे सरकून कोळीवे गावापर्यंत पोहोचले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेतही यंदाचा पाणीसाठा कमी असल्याचे चित्र आहे. मागील वर्षी याच दिवशी धरणात 29.76 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. यंदा मात्र पावसाच्या विलंबामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.





