Girish Prabhune: वृद्धत्त्व हा शाप नसून, सुमधुर फळे देणारा वृक्ष; डॉ. गिरीश प्रभुणे यांचे प्रतिपादन
Girish Prabhune: ऑल आयकॉनिक सिनिअर सिटीझन्स असोसिएशनच्या (AISCA) वतीने तंत्रस्नेही साधन विकसित; सुरक्षितता, आरोग्य आणि स्वावलंबनासाठी ठरणार मैलाचा दगड.

Girish Prabhune – वृद्धत्व हा शाप नसून, आपल्या अनुभवाची सुमधुर फळे देणारा हा एक वृक्ष असतो. परंतु, आजच्या सामाजिक परिस्थितीत वयोवृद्धांना एकटेपण येते. अशा काळात एका साथीदाराची आवश्यकता असते. आएस्का ॲपच्या माध्यमातून वृद्धांना हा साथीदार मदतनीस ठरू शकेल. प्रत्यक्ष गरजेच्या क्षणी मदत, सहकार्य मिळाल्यास वृद्धांना आधार जाणवेल, असा विश्वास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केला. ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षितता,
आरोग्य, सामाजिक सहभाग आणि स्वावलंबनासाठी कार्यरत असलेल्या ऑल आयकॉनिक सिनिअर सिटीझन्स असोसिएशन (एआयएससीए) या संस्थेच्या वतीने विकसित केलेल्या आएस्का मोबाइल ॲपचे लोकार्पण शनिवारी (दि. २०) झाले. उद्योजक कृष्णकुमार गोयल, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी, आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, उद्योजक अरविंद बुधाणी, आपलं घरचे विजय फळणीकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, दिलीप पवार, उद्योजक एम. ए. तेजाणी, डॉ. सुभाष धिंग्रा, लोकमान्य हास्ययोगचे डॉ. प्रसाद आंबीकर,
ॲड. प्रमोद आडकर, असोसिएशनच्या संस्थापक आणि संचालिका शकीला शेख, डॉ. किशोर सरपोतदार, सुनीला कविटकर, सुहास घोडके, रवींद्र शाळू, अजित कुमठेकर उपस्थित होते. हे तंत्रस्नेही साधन ज्येष्ठांसाठी विश्वास आणि मदतनीस ठरेल. या ॲपची संकल्पना ही काळाची गरज आहे. समाजाला प्रेरणा देणारे ज्येष्ठ नागरिक या ॲपच्या वापरामुळे स्वत:ला सुरक्षित समजू शकतील, असे गोयल म्हणाले. जगताप, फळणीकर, तेजाणी, बुधाणी, आंबीकर, पवार, सूर्यवंशी यांनीही मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठांना हे ॲप मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे शेख यांनी प्रस्तावनेत सांगितले. सूत्रसंचालन सिद्धार्थ बेंद्रे यांनी, तर आभार डॉ. सरपोतदार यांनी मानले.





