पुण्यात पुन्हा जलवाहिनी फुटली! दांडेकर पूल परिसरात लाखो लिटर पाणी वाया, वाहतूक ठप्प

पुणे : पर्वती जलकेंद्रातून सदाशिवपेठ, शिवाजीनगर परिसराला पाणी पुरवठा करणारी ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी पुन्हा एकदा दांडेकर पूल परिसरात फुटली आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. मागील महिन्यातच ही जलाहिनी याच भागात फुटली होती. त्यामुळे वरील परिसराचा जलकेंद्राचा पाणी पुरवठा दोन दिवस विस्कळीत झाला होता.
दांडेकर पुलावरून स्वारगेट कडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्री साडेनऊच्या सुमारास ही जलवाहिनी फुटली. या पाण्याचा वेग एवढा मोठा होता की या ठिकाणचा रस्ता पूर्णतः उखडून आला आहे. दोन दिवसापूर्वीच याच भागात शिवाजीनगरला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली होती. त्याचे दुरुस्तीचे काम सुरू असतानाच आता दुसरी जलवाहिनी फुटली आहे. ही माहिती मिळताच पाणी बंद करण्यात आले असले तरी जवळच असलेल्या घराच्या परिसरात पाणी पसरू लागले होते.
तसेच पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने स्वारगेट कडे जाणारा रस्ताही बंद करण्यात आल्याने या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. तर काही वेळाने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूनेही मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने जलवाहिनी दोन ठिकाणी फुटल्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.





