पुण्यात पाणी पाणी…; तासभर पडलेल्या धो-धो पावसाने रस्ते जलमय

पुणे – शहरासह उपनगरांत सलग दुसऱ्या दिवशी दुपारी जोरदार सरींना सुरवात झाली आणि तासभर पडलेल्या धो-धो पावसाने पुण्यातील रस्ते जलमय झाले. शहराच्या मध्यवर्ती भागात शिवाजीनगर येथे सर्वाधिक ४५ मिमी पावसाची नोंद झाली, तर लोहगाव येथे ४० आणि पाषाण परिसरात २५ मिमी पावसाची नोंद झाली.
गेल्या ४८ तासांपासून पुणे शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. मंगळवारी (दि. १६) सकाळपासून शहर आणि उपनगरात पावसाच्या हलक्या सरींना सुरवात झाली. दुपारी बाराच्या सुमारास धो-धो पावसाला सुरवात झाली. सुमारे एक ते दीड तास झालेल्या पावसामुळे अनेक रस्ते आणि चौक पाण्याखाली गेले. त्यामुळे वाहतूक मंदावली. पादचारी नागरिकांचीही मोठी तारांबळ उडाली.
केळकर रस्ता, डेक्कन, जंगली महाराज रोड, बाजीराव रोड, कर्वे रस्ता, शास्त्री रस्ता, स्वारगेट, टिळक रस्ता, कुमठेकर रोड याठिकाणी रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहू लागले. उपनगरातील कोथरूड, पाषाण, औंध, खडकी, येरवडा, विश्रांतवाडी, वारजे, धायरी, कात्रज, धनकवडी, हांडेवाडी, नांदेड फाटा, मगरपट्टा, लोहगाव, हडपसर परिसरातही जोरदार पाऊस झाल्याने काही दुकाने आणि सोसायट्यांमध्ये पाणी घुसले.
शहरासह उपनगरात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कमाल तापमानात लक्षणीय घट झाली आहे ३१ ते ३२ अंशावर पोहोचलेले कमाल तापमान आज २५ ते २६ अंशांपर्यंत खाली आले. पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यात मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडेल, त्यामुळे पुण्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.





