Waste Management: मोशी दुर्घटनेनंतरही महापालिकेचा भोंगळ कारभार! दोन विभागांच्या भांडणात शहराची कचराकोंडी
Waste Management: मोशी डेपोवर कचरा टाकण्यासाठी जागेची टंचाई; गाड्या रिकाम्या होण्यास उशीर होत असल्याने संकलन व्यवस्थेचा फजितवा.

Waste Management – पिंपरी-चिंचवड शहरातील कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी दोन विभागांमध्ये विभागली असून या दोन विभागांमध्ये असलेल्या समन्वयाच्या अभावामुळे शहरातील कचऱ्याचा प्रश्न जटील बनला आहे. शहरातून कचरा संकलित करण्याची जबाबदारी आरोग्य विभागाकडे, तर हा कचरा ज्या मोशी डेपोवर जातो, त्या डेपोचे नियंत्रण पर्यावरण विभागाकडे आहे. त्यामुळे एका विभागाने कचरा उचलला तरी पुढील व्यवस्थापन दुसऱ्या विभागाच्या अखत्यारित येते.
या दोन विभागांमध्ये अपेक्षित समन्वय नसल्याने आता शहरातील कचरा व्यवस्थापनाचीच कोंडी झाली आहे. शहरातील रस्ते, सोसायट्या आणि सार्वजनिक ठिकाणांवर कचरा साचत असताना आरोग्य विभागाकडून कचरा संकलनाची व्यवस्था सुरळीत असल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे, डेपोवरील व्यवस्थापनाची जबाबदारी पर्यावरण विभागाकडे असल्याने तेथील अडचणींचा परिणाम संकलन व्यवस्थेवर होत आहे. कचरा उचलणारा विभाग आणि कचरा स्वीकारणारा विभाग वेगळा आहे.
त्यांच्यातील समन्वयाची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली नाही. कचरा संकलन, वाहतूक, डेपो व्यवस्थापन, प्रक्रिया आणि विल्हेवाट ही स्वतंत्र कामे असली तरी ती एकाच कचरा व्यवस्थापन साखळीतील घटक आहेत. मग त्यासाठी दोन स्वतंत्र विभागांच्या नियंत्रणाची आवश्यकता काय, असा सवाल उपस्थित होत आहे. कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र आणि सक्षम यंत्रणा निर्माण करून संकलनापासून अंतिम विल्हेवाटीपर्यंतची संपूर्ण जबाबदारी एकाच विभागाकडे देण्याची वेळ आली आहे.
अन्यथा आरोग्य विभाग पर्यावरण विभागाकडे, तर पर्यावरण विभाग आरोग्य विभागाकडे बोट दाखवत राहणार आणि त्यामध्ये शहर मात्र कचऱ्याखाली दबत राहणार आहे. कचरा डेपोवरील कामकाजाबाबत अतिरिक्त आयुक्तांकडून सूचना दिल्या जात असतानाही संबंधित कर्मचारी त्याला अपेक्षित प्रतिसाद देत नसल्याच्या तक्रारी आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेशच डेपोपर्यंत पोहचत नसल्याची परिस्थिती आहे. त्यावरून महापालिकेचे प्रशासकीय नियंत्रण नसल्याचे समोर येत आहे.
अधिकाऱ्यांनी बैठका घ्यायच्या, आदेश काढायचे आणि प्रत्यक्षात मात्र कचऱ्याचे ढीग कायम राहायचे, अशी स्थिती असेल तर प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. नागरिकांच्या घरातून कचरा उचलण्यापासून त्याची अंतिम विल्हेवाट लावण्यापर्यंतची जबाबदारी एका छत्राखाली आणण्याऐवजी महापालिकेने ती विभागून ठेवली आहे. त्याचा परिणाम आता कचऱ्याच्या रुपाने रस्त्यावर दिसत आहे.
“मोशी कचरा डेपो येथे कचरा टाकण्यास रात्री १२ पर्यंत टाकण्याची परवानगी आहे. मात्र, तिथे असलेली जागा कमी पडत आहे. काही वेळा जागा शोधून त्या ठिकाणी कचरा टाकावा लागते. त्यामुळे आलेल्या गाड्या रिकाम्या होण्यासाठी काही काळ वाट पहावी लागते.”
– प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, महापालिका
“आरोग्य विभागाकडून कचरा वेळेत उचलला जातो. मात्र, कचरा डेपोवर जाणाऱ्या गाड्या जागेअभावी वेळेत रिकाम्या होत नाहीत. तसेच शहरातील कचरा उचलण्याबरोबरच हस्तांतरण केंद्रांवर जमा केलेला कचराही डेपोवर नेण्यात येत आहे. त्याचा परिणाम शहरातील कचरा व्यवस्थापनावर होत आहे.”
– डॉ. प्रदीप ठेंगल, उपायुक्त, महापालिका





