Warkari Dindi Robbery: वारीच्या वाटेवर धक्कादायक प्रकार! फलटणजवळ वारकऱ्यांच्या दिंडीवर दगडफेक; ७० हजार लुटले
Warkari Dindi Robbery: बीड जिल्ह्यातील मोरवड येथील श्री संत ज्ञानराज पालखी सोहळा दिंडीवर फलटण तालुक्यातील काशीदवाडी येथे मध्यरात्री अज्ञात ३ ते ४ इसमांकडून भ्याड हल्ला.

Warkari Dindi Robbery – काशीदवाडी, ता. फलटण येथे मध्यरात्रीच्या सुमारास वारकर्यांच्या दिंडीवर दगडफेक करत चालकाला मारहाण करून 70 हजार रुपयांची रोकड व महत्त्वाची कागदपत्रे लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी त्र्यंबक आश्रुबा कोळेकर (रा. मोरवड, ता. वडवणी, जि. बीड) यांनी सासवड येथे जबाब देत अज्ञात आरोपींविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे. त्र्यंबक कोळेकर हे सुमारे 14 वर्षांपासून त्यांच्या गावातील श्री संत ज्ञानराज पालखी सोहळा दिंडीचे चालक म्हणून कार्यरत आहेत.
दि. 4 जुलै 2026 रोजी गावातून दोन ट्रक आणि सुमारे 100 ते 150 वारकरी घेऊन ते पालखी सोहळ्यासाठी रवाना झाले होते. दि. 5 जुलै रोजी पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन दिंडी आळंदीच्या दिशेने निघाली होती. प्रवासादरम्यान दिंडीतील काही वारकरी मागे राहिल्याचे समजल्याने सर्वजण त्यांची वाट पाहण्यासाठी फलटण तालुक्यातील काशीदवाडी परिसरात थांबले असताना रात्री सुमारे 1 ते 1.30 वाजण्याच्या सुमारास रस्त्यालगत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये काही वारकरी विश्रांती घेत होते.
अचानक त्यांच्या दिशेने दगडफेक सुरू झाली. त्यामुळे अनेक वारकरी घाबरून ट्रकमध्ये जाऊन बसले. यावेळी एका महिलेने भीतीने आरडाओरडा केल्याने त्र्यंबक कोळेकर यांना धक्का बसून चक्कर आली आणि ते खाली पडले. काही वेळाने शुद्धीवर आल्यानंतर परिसरात शांतता होती आणि दिंडीचे दोन्ही ट्रक पुढे निघून गेले होते. त्याचवेळी 3 ते 4 अज्ञात इसम त्यांच्या जवळ आले. त्यांनी त्यांचा मोबाइल फोन हिसकावून फोडला, मारहाण केली आणि खिशातील पाकीट जबरदस्तीने काढून घेतले.
त्या पाकिटामध्ये 70 हजार रुपये रोख रक्कम, आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच इतर महत्त्वाची कागदपत्रे होती. आरोपी हे सर्व साहित्य घेऊन पसार झाल्याचे कोळेकर यांनी जबाबात नमूद केले आहे. दरम्यान, काही वेळाने दिंडीचे ट्रक परत आल्यानंतर त्यांनी सहकार्यांना घडलेला प्रकार सांगितला. यावेळी शिवाजी नाईकवाडे, श्रीरंग चिंचकर, सूरज रोहीदास सरक, सुभाष बडे आणि जयवंत नारायण झेंडे हे उपस्थित होते. घटनेनंतर वारकरी भयभीत झाल्याने त्यांनी डायल 112 वर संपर्क साधला.
पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तक्रार देण्यास सांगितले होते. मात्र भीतीमुळे आणि पुढील प्रवासाची घाई असल्याने त्यावेळी औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. घटनेनंतर आठवडाभराने सासवड येथे उपस्थित असताना त्र्यंबक कोळेकर यांनी संपूर्ण प्रकाराचा सविस्तर जबाब देत अज्ञात आरोपींविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे. आरोपी समोर आल्यास ओळखू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या घटनेमुळे वारकरी संप्रदायात संताप व्यक्त होत असून दोषींना तातडीने अटक करण्याची मागणी होत आहे.






