Pune Mumbai Expressway: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर खळबळ! ट्रॅफिक पोलिसांनी प्रवाशांना मागितली ५ लाखांची खंडणी?
Pune Mumbai Expressway: विमाननगरच्या तरुणांना पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर गाठले; गांजाचे कारण पुढे करत तळेगाव परिसरात नेऊन धमकावले.

Pune Mumbai Expressway – पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर स्वतःला हायवे ट्रॅफिक पोलीस (HSP Police) म्हणून ओळख सांगत सहा अज्ञात व्यक्तींनी प्रवाशांना अडवून पाच लाख रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात अज्ञात सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार (दि.५ जुलै रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास मौजे ताजे (ता. मावळ) हद्दीत ही घटना घडली. फिर्यादी भुषीत उमेश शर्मा (वय २८, रा. विमाननगर, पुणे) हे मित्र व नातेवाईकांसह टाटा पंच (MH-12 WZ 1692) कारमधून लोणावळ्याकडे जात असताना अंबर दिवा लावलेल्या झायलो वाहनातून आलेल्या सहा जणांनी त्यांची कार अडवली. आरोपींनी स्वतःला “हायवे ट्रॅफिक पोलीस (HSP Police)” असल्याचे सांगत वाहनात गांजा व अमली पदार्थ असल्याचा संशय व्यक्त केला.
वाहनातील एका व्यक्तीकडे सिगारेटचे पाकीट आढळल्याचे कारण पुढे करत पोलीस कारवाईची भीती दाखवून पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली. यानंतर फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांच्या वाहनासह तळेगाव परिसरात नेऊन एटीएममधून पैसे काढण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलीसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे आरोपींच्या लक्षात येताच ते घटनास्थळावरून पसार झाले.
कामशेत पोलीस ठाण्यात अज्ञात सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके नियुक्त करण्यात आली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, टोल नाक्यांवरील नोंदी, तांत्रिक पुरावे आणि इतर उपलब्ध माहितीच्या आधारे तपास सुरू आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत असून, पोलीस निरीक्षक आकाश पवार यांनी आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला आहे.





