Saswad Crime – सासवड शहर परिसरात एका नामांकित डॉक्टरवर खंडणीसाठी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सामाजिक व ग्रामपंचायत राजकारणातील वादातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. आरोपींच्या अटकेसाठी पथके रवाना केल्याची माहिती दिली आहे. डॉ. सुभाष दत्तात्रय शिवतारे (वय ३६, जनहीतार्थ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कोडीत नाका, सासवड- हिवरे रोड, रा. सुपे खुर्द, ता. पुरंदर) यांनी सासवड पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. आरोपी महेश राऊत हा तीन वर्षांपासून डॉ. शिवतारे यांना मानसिक त्रास देत असून सोशल मीडियावर बदनामीही करीत होता. (दि.१८) रोजी सकाळी डॉ. शिवतारे हे त्यांच्या पार्टनर गणेश शेंडकर यांच्यासोबत दुचाकीवरून सासवडहून सुपे खुर्दकडे जात होते. दत्तात्रय भोंगळे यांच्या बंगल्याजवळ आरोपीने त्यांची दुचाकी अडवली. “तू ग्रामपंचायत राजकारणात माझे ऐकत नाहीस, त्यामुळे तुझे आयुष्य उद्ध्वस्त करीन. तू बोगस डॉक्टर आहेस. तुझ्या हॉस्पिटलची बदनामी करून तुझे करिअर संपवीन. मी केलेला अर्ज मागे घ्यायचा असेल तर ५ लाख रुपये दे,” अशी धमकी देत आरोपीने डॉ. शिवतारे यांना मारहाण केली. यात डॉक्टरांच्या डाव्या हाताच्या करंगळीला गंभीर दुखापत झाली. भांडण सोडवण्यासाठी शुभम जाधव व आकाश जाधव हे दोघे आले. त्यावेळी आरोपीने त्यांनाही मारहाण केली. यात शुभम जाधव यांच्या पायाच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाले. पोलीस पुढील तपास करीत आहेत. सासवड रुग्णालयात धिंगाणा फिर्यादी व जखमी सासवड पोलीस ठाण्याकडे जात होते. भोंगळे वस्तीत आरोपी स्वप्नील राऊत व लोकेश राऊत हे दुचाकीवरून आले. लोकेश याने आकाश जाधव याला मारहाण करून जखमी केले. औषधोपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात गेल्यानंतरही आरोपींचा धुडगूस सुरूच राहिला. अमोल पवार, लोकेश राऊत, आदित्य राऊत, सचिन राऊत, जितेंद्र राऊत व ओम राऊत यांनी शुभम व आकाश जाधव यांना मारहाण केली.