Wari Rangoli: रांगोळीतून साकारली पंढरपूर वारी! वरद विनायक मंदिरात २० कलाकारांकडून ३० तास परिश्रम
Wari Rangoli: संकष्टी चतुर्थी आणि आषाढी वारीचे औचित्य; रंगछंद मंडळाच्या कलाकारांनी महडच्या ऐतिहासिक मंदिरात रेखाटला वारीचा जिवंत देखावा.

Wari Rangoli – संकष्टी चतुर्थीनिमित्त अष्टविनायकांपैकी एक असलेल्या महड येथील वरद विनायक मंदिरात रांगोळीच्या माध्यमातून पंढरपूर वारीचा देखावा साकारण्यात आला. हा कलाविष्कार पाहताना प्रत्यक्ष पंढरीच्या वारीत सहभागी झाल्याचा अनुभव भाविकांना येत होता. या अनोख्या रांगोळी प्रदर्शनाने भाविकांचे लक्ष वेधून घेतले. रंगछंद मंडळाच्या माध्यमातून २० कलाकारांनी सलग ३० तासांहून अधिक परिश्रम घेत सुमारे २० किलो रांगोळीचा वापर करून पंढरपूर वारीचे चित्र साकारले.
आषाढी आणि कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर रेखाटण्यात आलेल्या या रांगोळीत विठ्ठल-रखुमाई, वारकरी, डोक्यावर तुळस घेऊन चालणाऱ्या महिला, पालखी सोहळा, फुगडी, भजन-कीर्तन, टाळ-मृदुंगाचा गजर तसेच भगवा ध्वज खांद्यावर घेतलेले वारकरी अशी अनेक दृश्ये अत्यंत बारकाईने साकारण्यात आली होती. पहाटे महापूजेनंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले.
सकाळी पावसाच्या सरी सुरू असल्याने भाविकांची उपस्थिती तुलनेने कमी होती. मात्र सायंकाळी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. रात्री उशिरापर्यंत मंदिर परिसरात भक्तांची रीघ लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. दर महिन्याला संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिर परिसरात सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक विषयांवर आधारित रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन केले जाते.
यंदा पंढरपूर वारीचा विषय निवडण्यात आला होता. रंगछंद मंडळाचे अध्यक्ष रोशन पाटील (कसरखंड) यांना या उपक्रमासाठी वरद विनायक मंडळाचे सहकार्य लाभले. कलाकारांनी अनेक तासांच्या मेहनतीने साकारलेल्या या कलाविष्काराचे भाविक आणि नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.
“गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी देवस्थानतर्फे आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. सकाळी पावसामुळे भाविकांची संख्या कमी होती, मात्र सायंकाळी पाऊस थांबल्यानंतर रात्रीपर्यंत मोठी गर्दी झाली.”
– मोहिनी वैद्य, कार्याध्यक्षा, महड देवस्थान





